मिरी : पाथर्डी तालुक्यातील अतिसंवेदनशील समजल्या जाणा-या जवखेडे खालसा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्ताधारी गटाकडून सत्ता ताब्यात मिळवण्यात विरोधी गटाला यश आले. सरपंच पदासाठी सत्ताधारी गटाकडून सुनंदा वाघ व विरोधी गटाकडून लक्ष्मीबाई वाघ या दोन जावांमध्ये झालेल्या अटीतटीच्या लढतीत लक्ष्मीबाई वाघ तब्बल ९६१ मते मिळवून विजयी झाल्या.गेल्या चाळीस वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर वृद्धेश्वर साखर कारखान्याचे संचालक व राजळे समर्थक उद्धव वाघ यांचेच एकहाती वर्चस्व असल्याने त्यांचेच पुतणे राष्ट्रवादीचे युवानेते अमोल वाघ यांनी स्वतंत्र पॅनल उभा करून उध्दव वाघ यांच्यासमोर कडवे आव्हान निर्माण करून निवडणुकीत रंगत आणली.सरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत सुनंदा वाघ, लक्ष्मीबाई वाघ या दोन जावा व नलिनी वाघ यांच्यात तिरंगी सामना रंगला. यामध्ये नलिनी वाघ यांना ४८७, सुनंदा वाघ यांना ८१६ व लक्ष्मीबाई वाघ यांना ९६१ मते मिळाल्याने त्यांच्या समर्थकांनी जल्लोष केला.एकूण १२ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले. विरोधी अमोल वाघ गटाचे सरपंच पदासह एकूण नऊ उमेदवार निवडून येऊन सत्तापालट झाली. तत्पूर्वी मतदानाच्या पूर्वसंध्येलाच विरोधी गटाचे अमोल वाघ यांनी तिसºया गटाचे नेतृत्व करणारे सुरेश वाघ यांच्याशी हातमिळवणी करून सत्ताधारी गटाला चितपट करण्याचा डाव आखल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये ऐकावयास मिळाली.अमोल वाघ राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते असून राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांचे समर्थक मानले जातात. त्यामुळे तनपुरे यांनी विजयी सभेत प्रत्यक्ष हजेरी लावून वाघ यांना शुभेच्छा दिल्या.
विजयी उमेदवार
विरोधी गटाकडून लक्ष्मीबाई वाघ (सरपंच). सदस्य- उत्तम कासार, राणी कासार, द्वारकाबाई भोसले, नितीन जाधव, मीराबाई वाघ, शकिलाबी पठाण, अॅड. वैभव आंधळे, सुनीता सरगड, सत्ताधारी गट- अनिता आंधळे, भागवत घाटुळ, उध्दव मतकर.