अहमदनगर : यंदा उन्हाळी सुटीनंतर शाळा १५ जूनला उघडणार असून जिल्हा परिषदेसह अनुदानित शाळांमध्ये पहिल्याच दिवशी मोफत पाठ्यपुस्तके दिले जाणार आहेत. नगर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंत एकूण साडेचार लाख विद्यार्थी आहेत. त्यांना ही पुस्तके मिळणार असल्याने सर्वसामान्य पालकांची चिंता मिटणार आहे.
समग्र शिक्षा अभियानांतर्गत शासकीय शाळा (समाजकल्याण, आदिवासी विकास, सेंट्रल स्कूल, नवोदय), स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा (जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळ), तसेच शासन अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप दरवर्षी करण्यात येते. यानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५३ हजार ८७९ विद्यार्थ्यांना पुस्तके मिळावीत, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने राज्य सरकारच्या बालभारती विभागाकडे केली आहे.
मागणी केलेली पुस्तके शिक्षण विभागाकडे उपलब्ध झाल्यानंतर ही पुस्तके तालुकास्तरावरील गटशिक्षण अधिकाऱ्यांकडे देण्यात येतील. तेथून केंद्रप्रमुख तसेच मुख्याध्यापकांकडे पुस्तके पोहोचविण्यात येणार असून, विद्यार्थ्यांना सर्व पुस्तके शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली याचे नियोजन करण्यात येत आहे.
शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तकांचे वितरण होणार आहे. पाठ्यपुस्तकांची मागणी बालभारतीकडे नोंदवली आहे.- भास्करराव पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)