रामप्रसाद चांदघोडे
घारगाव (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील (येठेवाडी) खंदरमाळ परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे वांदरकडा येथील परिसरातून गेलेल्या विद्युत वाहिनीची तार तुटली. या वाहिनीला विद्युत प्रवाह सुरू होता. घरापासून काही अंतरावर तळ्याजवळ अंघोळीसाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील चार चिमुकल्यांचा विजेच्या विद्युत तारेला स्पर्श झाला. यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.८) वांदरकडा (येठेवाडी) येथे दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर मुले आदिवासी कुटुंबातील असून घरची परिस्थिती बिकट असल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, दर्शन अजित बर्डे (वय ६), विराज अजित बर्डे (वय ५), अनिकेत अरुण बर्डे (वय ६), ओंकार अरुण बर्डे (वय ७) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. ते येठेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकत होते. हे चौघे शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी गेले. दुपारच्या वेळी ते खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या वांदरकडा येथील छोट्याशा तळ्यात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान, अंघोळ करत असताना तळ्यावरून गेलेल्या तुटलेल्या वीजवाहक तारेचा शॉक लागून या चारीही मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजताच आजूबाजूच्या नागरिकांसह शिवसेनेचे तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, अशोक वाघ, रामनाथ कजबे,तलाठी युवराजसिंग जारवाल, घारगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजू खेडकर, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, हरिश्चंद्र बांडे, प्रमोद चव्हाण यांसह महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलांचे मृतदेह तळ्याच्या बाहेर काढण्यात आले. पावसामुळे रस्ता खराब झाल्याने चारही मुलांचे मृतदेह झोळीच्या माध्यमातून तरुणांनी रुग्णवाहिकेपर्यंत नेले. रुग्णवाहकेतून मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यावेळी संतप्त झालेल्या नागरिकांनी विजवितरण कंपनीच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त केला.