अहमदनगर : सुमारे वर्षभरापूर्वी पारनेर तालुक्यात उघडकीस आलेल्या टँकर घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या विभागीय आयुक्तांच्या चौकशीत चौघांना दोषी धरण्यात आले आहे. यात तत्कालीन गटविकास अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक आणि दोन कनिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्यावर कारवाई करणार आहेत.सुमारे वर्षभरापूर्वी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या कार्यकाळात हा घोटाळा उघड झाला होता. पारनेर तालुक्यात पाणी पुरवठा करण्याचा ठेका घेतलेल्या संस्थेने जिल्हा परिषद प्रशासनाच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला होता. यात खेपाचे आंतर वाढविण्यात आले होते. यामुळे जिल्हा परिषदेचे ७३ लाख रुपये अतिरिक्त जाणार होते. पारनेर पंचायत समितीतील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला होता. सुरूवातीला जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने या घोटाळ्याची चौकशी केली होती. त्यात त्यांना चार अधिकारी- कर्मचारी दोषी आढळले होते. यामुळे या प्रकरणाची चौकशी विभागीय आयुक्त पातळीवर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ही चौकशी आता पूर्ण झाली असून त्याचा अहवाल नुकताच जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यात तत्कालीन प्रभारी अधिकारी आणि सध्या जामखेड पंचायत समितीत विस्तार अधिकारी पदावर कार्यरत असणारे दयानंद पवार, कार्यालयीन अधीक्षक पी.पी. देवळालीकर, कनिष्ठ सहाय्यक आर.जे. औटी आणि एस.पी. तुळेकर यांना दोषी धरण्यात आलेले आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल त्यांच्यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(प्रतिनिधी)
पारनेर टँकर घोटाळा प्रकरणी चौघे दोषी
By admin | Published: September 12, 2014 11:02 PM