सुदाम देशमुखअहमदनगर : आमची युती ओरिजनल भाजपशी आहे, असे मत शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड नेहमीच व्यक्त करतात. त्याचा प्रत्यय खुद्द भाजपलाच या निवडणुकीत आला आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेल्यांचा विजय आणि पक्षातील उमेदवारांचा पराभव झाला आहे. निवडून आलेल्या १४ पैकी पूर्वीपासून भाजपात काम करणारे फक्त चारच नगरसेवक आहेत. त्यामुळे महापालिकेत ओरिजनल भाजप हा चार नगरसेवकांचाच असल्याची स्थिती आहे.महापालिकेत आतापर्यंत शिवसेना आणि भाजपची युती होती. युती नव्हती, अशी ही पहिली निवडणूक ठरली. त्याचा सर्वाधिक फटका भाजपला बसला आहे. भाजपचे २०१३ मध्ये नऊ नगरसेवक निवडून आले होते. त्यामध्ये सुवेंद्र गांधी, बाबासाहेब वाकळे, मालन ढोणे, मनीषा काळे-बारस्कर, दत्ता कावरे, श्रीपाद छिंदम, उषाताई नलवडे, महेश तवले आणि नंदा साठे यांचा समावेश होता.दत्ता कावरे हे शिवसेनेत गेले आणि पुन्हा निवडून आले. श्रीपाद छिंदमची भाजपमधून हकालपट्टी झाली आणि तो अपक्ष म्हणून पुन्हा निवडून आला. मनीषा काळे-बारस्कर यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही. त्यांनी अपक्ष निवडणूक लढविली मात्र त्याही पराभूत झाल्या.विद्यमान नगरसेवकांपैकी सुवेंद्र गांधी, उषाताई नलवडे, महेश तवले, नंदा साठे यांचा धक्कादायक पराभव झाला. पूर्वीपासून भाजपात असलेले आणि विद्यमान नगरसेवकांपैकी बाबासाहेब वाकळे आणि मालन ढोणे हे दोनच नगरसेवक पुन्हा निवडून आले.पूर्वीपासून भाजपात काम करणारे महेंद्र उर्फ भैया गंधे आणि माजी सभापती सोनाबाई शिंदे या निवडून आल्या.त्यामुळे ओरिजनल भाजपची संख्या फक्त चारच असल्याचे दिसते. केडगावचे नगरसेवक भाजपात नसते तर भाजपची महापालिकेतील संख्या दहा इतकीच होती.बाहेरून आलेल्या उमेदवारांचा विजयअन्य पक्षातून भाजपात आलेल्यांमध्ये स्वप्नील शिंदे (राष्ट्रवादी), मनोज दुलम (शिवसेना), आशा कराळे, सोनाली चितळे (राष्ट्रवादी), वंदना ताठे, रवींद्र बारस्कर, आणि राहुल कांबळे, गौरी ननावरे, लता शेळके, मनोज कोतकर (केडगाव काँग्रेस) हे निवडून आले. पक्षात बाहेरून आलेल्यांपैकी किशोर डागवाले, शारदा ढवण, सुनीता भिंगारदिवे या विद्यमान नगरसेवकांना पराभवाला सामोरे जावे लागले. पक्षातील अशोक कानडे, गायत्री कुलकर्णी, वंदना कुसळकर-शेलार, संगीता खरमाळे या भाजपच्या ओरिजनल उमेदवारांचा पराभव झाला. याशिवाय भाजपने आयात केलेल्या सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. इतर पक्षातून २३ जणांना भाजपने पावन केले होते.माळीवाडा येथील प्रभाग बाराने वाजवले बारामाळीवाडा येथील प्रभाग १२ मधून दीप्ती गांधी यांना उमेदवारी दिल्याने खा. दिलीप गांधी, सुवेंद्र गांधी यांचे सर्व लक्ष प्रभाग १२ मध्येच होते. त्यामुळे सुवेंद्र हे त्यांच्या स्वत:च्या प्रभाग ११ मध्ये लक्ष देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पॅनलमधील सर्वच उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. हीच स्थिती प्रभाग १२ मध्येही होती. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या निर्मला गिरवले यांनाही भाजप निवडून आणू शकला नाही, तर खा. गांधी यांचे खंदे समर्थक शैलेश मुनोत,नंदा साठे यांनाही हार पत्करावी लागली.शिवसेना कोणाशी युती करणार?आम्ही ओरिजनल भाजपसोबत आहोत, असे सतत सांगणारे अनिल राठोड आता महापालिकेत भाजपशी युती करणार की नाही? हे पाहणे महत्त्वाचे आहे. ओरिजनल भाजपशी युती करायची झाल्यास शिवसेना फक्त चारच भाजप नगरसेवकांचा पाठिंबा घेणार का? असा प्रश्न आहे. शिवसेनेचे २४, बसपाचे ४ आणि ओरिजनल भाजपचे ४ अशी गोळाबेरीज केली तर ही संख्या ३२ होते. त्यामुळे भाजपच्या सर्वच नगरसेवकांचा पाठिंबा घेतल्याशिवाय शिवसेनेला सत्ता स्थापन करणे अशक्य होणार आहे. ओरिजनल भाजपचे सातही बंडखोर निवडून आले नाहीत.
ओरिजनल भाजपाचे चारच नगरसेवक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 11:24 AM