लोणी : येथील दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात चोरीस गेलेले एकूण १५ तोळे सोने व ७० हजार रुपयांच्या रकमेसह चार आरोपी जेरबंद करण्यात लोणी पोलिसांना यश आले. पाकिटमारीतील ३ गुन्हेगार श्रीरामपूरचे, तर घरफोडीतील एक नेपाळी असल्याचे निष्पन्न झाले. चारही आरोपींना न्यायालयाने बुधवार १७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली.किसन हिरासिंग रसैली (४६, रा. नेपाळ, हल्ली मुक्काम लोणी खुर्द) यास घरफोडीच्या गुन्ह्यात तर नासीर चांद शेख , बाबाखान खावसखान पठाण, गोविंद दत्तात्रय नानुस्कर (रा. तिघेही श्रीरामपूर) यांना अटक केली.९ जानेवारीस मध्यरात्री सत्यवान रामदास गाडगे (रा. विठ्ठलप्रभा हौसिंग सोसायटी,लोणी)यांच्या घरी चोरी होऊन १५ तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रोख रक्कम असा २ लाख ९६ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला होता. लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व फौजदार भालचंद्र शिंदे यांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपी किसन हिरासिंग रसैली यास रविवारी संक्रातीच्या दिवशी अटक केली. पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी १५ तोळे सोने व २५ हजार रूपये हस्तगत केले.११ जानेवारीस लोणी बस स्थानकात दुपारी २ च्या दरम्यान श्याम अर्जुन गाढे (रा. बारागाव नांदूर, ता.राहुरी) हे नातेवाईकास भेटण्यासाठी प्रवरा रुग्णालयात आले होते. लोणी बस स्थानकात त्यांच्या खिशातील ४५ हजार रुपये चोरट्याने लंपास केले होते. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासणी केली. यामध्ये नासीर चांद शेख, बाबाखान खावस खान पठाण, गोविंद दत्तराय नानुस्कर हे चोरी करताना आढळले. त्यांना १३ जानेवारीस अटक केली. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
लोणीतील कॅमे-याची पहिली शिकार
प्रवरा परिसरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीवर आळा बसविण्याच्या दृष्टीने महिन्यापूर्वी लोणीत सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविले होते. बसस्थानक परिसरातील कॅमे-यात श्रीरामपूरचे तीन पाकीटमार कैद झाले. त्यामुळे लोणीतील कॅमेºयांची ते पहिली शिकार ठरले.