अहमदनगर : नगर जिल्ह्यात कोपरगाव आगारातील यांत्रिकी विभागाचे कर्मचारी ॲानड्युटी पत्ते खेळतानाचा तसेच एसटी महामंडळाच्याच कर्मचाऱ्यांना उद्धट वागणूक देतानाचा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वी व्हायरल झाल्यानंतर आगारप्रमुखांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार यातील चार कर्मचारी निलंबित केले. परंतु, व्हिडीओत सात ते आठ जण पत्ते खेळताना दिसत असूनही केवळ चौघांवरच कारवाई कशी, इतरांवर मेहेरनजर का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शनिवारी (दि. १२ जून) कोपरगाव आगारातील वर्कशाॅपमध्ये यांत्रिकी विभागातील आठ ते दहा कर्मचाऱ्यांचा पत्त्यांचा डाव रंगला होता. त्याचदरम्यान धुळे जिल्ह्यातील शहादा आगाराची बस कोपरगाव आगारात दाखल झाली. या बसच्या चाकांमध्ये हवा कमी असल्याने संबंधित बसच्या वाहक-चालकाने वर्कशाॅपमध्ये जाऊन आपल्या बसची हवा चेक करण्याची विनंती कोपरगाव यांत्रिकी विभागातील कर्मचाऱ्यांना केली. परंतु, पत्ते खेळण्यात मश्गुल असलेल्या कर्मचाऱ्यांनी या चालक-वाहकाला मदत करण्याऐवजी उद्धट उत्तरे देत बोळवण केली.
ड्युटीवर असताना एकतर हे कर्मचारी पत्ते खेळत होते आणि दुसरीकडे आपल्याच कर्मचाऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांना उद्धट वागणूक देत होते. त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत होती.
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नगर विभागीय कार्यालयापासून मुंबईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, कोपरगावचे आगारप्रमुख अभिजित चौधरी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार १३ जून रोजी या प्रकरणी चार कर्मचाऱ्यांना निलंबित केले.
--------
आगारप्रमुख नाॅट रिचेबल
व्हिडीओमध्ये सात ते आठजण पत्ते खेळताना स्पष्ट दिसत असूनही आगारप्रमुखांनी केवळ चौघांवरच कारवाई केली. इतरांवर कारवाई न करण्यामागे काय गौडबंगाल आहे. ज्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली, ती किती दिवसांसाठी केली. याबाबत ‘लोकमत’ने आगारप्रमुख चौधरी यांना सोमवारी दिवसभरात तीनदा संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून फोन उचलला गेला नाही.