नानासाहेब जठार विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील भिक्षेकरीगृहासह पिंपळगाव पिसा, चिंभळा व घायपातवाडी येथील भिक्षेकरीगृह मोडकळीस आले आहेत. भिक्षेकरीगृहांची शेतीही पडीक झाली आहे.शासनाने राज्यातील महानगरांमधील भिक्षुकांची संख्या कमी करून शहरातील नागरिकांना भिक्षुकांच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी भिक्षेकरीगृहांची निर्मिती केली. महानगरातील भिक्षुकांना पकडून या भिक्षेकरीगृहात त्यांचे पुनर्वसन करण्यात येते. या भिक्षेकरीगृहांना शासनाने कसण्यासाठी जमीन दिलेली आहे. भिक्षुक कैद्यांकडून शेतीच्या कामासह वेगवेगळे उत्पादक कामे करून घेतले जात होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून कैदी व कर्मचाऱ्यांची संख्या घटली. त्यामुळे सर्व उत्पादन बंद पडले व शेतीही पडीक पडली. सध्या विसापूर भिक्षेकरीगृहात ४५ कैदी व १५ अधिकारी, कर्मचारी आहेत.विसापूर येथील भिक्षेकरीगृहाची स्थापना सन १९४८ साली झाली. ज्या ठिकाणी भिक्षेकरीगृह सुरू करण्यात आले तेथे विसापूरचे कारागृह होते. कारागृहाचे नवीन बांधकाम झाल्यानंतर कारागृहाची जुनी जागा व इमारती भिक्षेकरीगृहास देण्यात आली.अजूनही भिक्षेकरीगृहाची जमीन व जागेची महसूल खात्याकडे अधीक्षक विसापूर जिल्हा कारागृह या नावानेच नोंद आहे. त्या परिसरात अद्याप ब्रिटिशकालीन इतिहासाच्या पाऊलखुणा असलेल्या मजबूत अंधार कोठड्या उभ्या आहेत. याच अंधार कोठडीत ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी एस. एम. जोशी, स. का. पाटील (पत्रिसरकार), नानासाहेब गोरे, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या असंख्य स्वातंत्रसेनानींनी सजा भोगलेली आहे.काही दिवसांपूर्वी सर्व भिक्षेकरीगृह समाजकल्याण विभागाच्या वतीने चालविण्यात येत होते. शासनाने महिला व बालकल्याण खात्याची निर्मिती केली. त्यानंतर भिक्षेकरीगृहांची जबाबदारी महिला व बालकल्याण आयुक्तालयाकडे सोपविण्यात आली. आता या भिक्षेकरीगृहांना घरघर लागली आहे.अधीक्षकांची माहिती देण्यास टाळाटाळविसापूर भिक्षेकरीगृहाचे प्रभारी अधीक्षक श्रीकांत मार्कड यांच्याशी ‘लोकमत’ने चर्चा केली. चर्चेदरम्यान भिक्षेकरीगृहाला कृषी सहायक आहे का? असेल तर गतवर्षी शेती उत्पादन किती? हे प्रश्न विचारले असता अगोदर शांतपणे चर्चा करणारे मार्कड एकदम गडबडले. तुम्ही आमच्या वरिष्ठ कार्यालयाची परवानगी घेतली का? विनापरवानगी भिक्षेकरीगृह परिसरात प्रवेश कसा केला? असे प्रतिप्रश्न त्यांनी केले. विसापूर भिक्षेकरीगृहाला स्वतंत्र कृषी सहायक असताना बरीच जमीन पडीक असते. शेती उत्पन्नही फारसे दिसत नाही. भिक्षेकरीगृहाचे जनमाहिती अधिकारी कोण आहेत, याबाबतचा फलकही आढळून आला नाही.शेतीची लागली वाट
विसापूर गावालगत तलावाच्या हद्दीत भिक्षेकरीगृहाचा सुमारे दहा एकर शेतमळा होता. या मळ्यात विहीर, पाणी उपसण्याची साधने, दोन कर्मचारी व त्यांना राहाण्यास खोल्या आदी सुविधा होत्या. मात्र गेल्या पाच ते सहा वर्षांत भिक्षेकरीगृहाने शेती कसणे बंद केल्याने या जमिनीचा ताबा काही स्थानिकांनी घेतला. एकीकडे जिल्हा खुल्या कारागृहाची शेती फुललेली असताना भिक्षेकरीगृहाची शेती मात्र पडीक झाली आहे.