अहमदनगर : जिल्ह्यात बुधवारी (१ जुलै) सकाळी १० रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला आहे. यामध्ये नगर शहर ७, अकोले तालुका २ आणि संगमनेर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान ९० वर्षांच्या आजीबार्इंसह चार जणांनी कोरोनावर मात केली. तर २९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
नगर शहरातील सिद्धार्थनगर येथील ३० वर्षीय पुरुष, सुडकेमळा येथील ५० वर्षीय महिला, पद्मानगर येथील ५७ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ६० वर्षीय पुरुष, ११ वर्षाचा मुलगा आणि ३० वर्षाचा युवक बाधित आढळून आला आहे. यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील हे सर्व रुग्ण आहेत.
अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा येथील २६ वर्षीय युवक आणि १७ वर्षीय युवती बाधित आढळून आली आहे. हे दोघे रुग्ण मुंबईहून प्रवास करून आले होते.
संगमनेर तालुक्यातील कुरण येथील ३५ वर्षीय युवक बाधित आढळून आला आहे. हा रुग्ण यापूर्वीच्या बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहे.
जिल्ह्यात अॅक्टिव रुग्णांची संख्या १५० झाली आहे. तर १४ जण मृत्यू पावले आहेत. एकूण रुग्णांची संख्या ४७५ झाली आहे. तर ३११ रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.