अहमदनगर: पाथर्डी तालुक्यातील आडगाव येथे शेतीच्या वादातून शेतक-याचे अपहरण करून खून करणा-या चौघा आरोपींना जिल्हा न्यायालयाने अजन्म कारावास व प्रत्येकी ३२ हजार रुपयांची दंडाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा न्यायाधीश आऱएम़ कुलकर्णी यांनी गुरुवारी हा निकाल दिला.
चंद्रकांत आनंदा बर्फे (वय ४४), अमोल चंद्रकांत बर्फे (वय २०), सुरेश आनंदा बर्फे (वय ५७) व शिवाजी आनंदा बर्फे (वय ४५ सर्व रा़ आडगाव ता़ पाथर्डी) असे शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत.
या चौघा आरोपींसह त्यांच्या साथीदारांनी ११आॅक्टोबर २०१८ रोजी सायंकाळी शेतीच्या वादातून अशोक रभाजी शेंडे यांना मारहण करत त्यांचे अपहरण केले होते. यावेळी अशोक यांनी त्यांचे बंधू राजू शेंडे यांना फोन केला होता. यावेळी राजू यांना अशोक व इतर लोकांमाध्ये वाद सुरू असल्याचे ऐकू आले. यावेळी राजू यांनी शेतात जाऊन पाहिले तेव्हा त्यांना घटनास्थळी कुणी आढळून आले नाही. यावेळी मात्र राजू यांना शेतात भेटलेले माणिक लोंढे यांनी अशोक यांना आरोपींनी मारहाण करून दुचाकीवर बसवून नेले असल्याचे सांगितले. त्यानंतर राजू शेंडे यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात फिर्याद दाखल केली.
दुस-या दिवशी मात्र अशोक शेंडे यांचा मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत करंजी-चिंचोडी रोडवरील धारवाडी शिवारात आढळून आला. आरोपींनी मृतदेहावर पेट्रोल टाकून पेटवून देत पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न केला होता.