श्रीगोंदा : शेडगाव येथे विनापरवाना खते साठवणूक करणे व विक्री करणे या विरोधात सिद्धीविनायक कृषी सेवा केंद्राचे चालक विजय रघुनाथ पवार (रा. जलालपूर, ता.कर्जत) याच्या विरोधात कृषी विभागाने गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ४ लाख ५६ हजार किंमतीचे खते कीटकनाशके जप्त केले आहेत. शनिवारी ही कारवाई केली.
संबधीत कृषी सेवा केंद्र हे कोणत्याही परवान्याशिवाय कार्यरत होते. या कृषी सेवा केंद्राची तपासणी, पंचनामा करून सील केले आहे. ही कारवाई तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के, डॉ. राम जगताप यांच्यासह अमजद तांबोळी किसन सांगळे, संदीप बोदगे यांच्या भरारी पथकाने केली. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश गावित हे करीत आहेत.
खत, बियाणे व कीटकनाशके विक्रेत्यांनी या कायद्याचे सक्तीने पालन करावे. कायद्याचे उल्लंघन केल्यास कृषी विभागाकडून फौजदारी कारवाई केली जाईल, असा इशारा श्रीगोंदा तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिला आहे.