अहमदनगर : आजपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालकमंत्री हसन मुश्रीफ, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे चार मंत्री नगरचे प्रतिनिधित्व करणार आहेत. महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात नगरचे हे चार मंत्री कशी बाजू मांडतात, यावर अर्थसंकल्पातील नगरचे स्थान ठरणार आहे. त्यामुळे चारही मंत्र्यांच्या भूमिकेकडे नगर जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळात नगर जिल्ह्याला झुकते माप दिले. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांच्या रुपाने नगर जिल्ह्याला महसूलमंत्री पद मिळाले. नेवाशाचे आमदार शंकरराव गडाख यांना सेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. राष्ट्रवादीने नगरविकास खात्याचे राज्यमंत्री पद आमदार प्राजक्त तनपुरे यांना बहाल केले आहे. पालकमंत्री पदही राष्ट्रवादीने आपल्या कोट्यात घेतले. पालकमंत्री अन्य जिल्ह्यातील असले तरी अन्य तीन मंत्री हे नगर जिल्ह्यात आहे. त्यामुळे नगरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. अर्थसंकल्पात भरीव तरतूद करून जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करणे शक्य आहे.
अर्थ व नियोजन खाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे. नाशिक येथे झालेल्या विभागीय बैठकीत त्यांनी नगरच्या भुईकोट किल्ल्यासाठी भरीव निधीची तरतूद केली. त्यांचे नगर जिल्ह्यावर विशेष लक्ष असल्याचे यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे. नगर जिल्ह्यातील मतदार राजाने राष्ट्रवादीचे सहा आमदार विधानसभेत पाठविले. त्याची परतफेड राष्ट्रवादी काँग्रेस अर्थसंकल्पात भरीव तरतूद करुन करणार का?, असा सवाल जिल्ह्यातील जाणकारांकडून उपस्थित केला जात आहे.
रखडलेली विकास कामेभुईकोट किल्ला सुशोभिकरण, शाळा खोल्यांची दुरुस्ती, रस्त्यांची दुरवस्था, महामार्गाची अर्धवट कामे, जिल्हा प्रशासनाची नवीन इमारत, नगर शहरातील नाटगृह, गड किल्ल्यांचे सुशोभिकरण, पर्यटन क्षेत्रांचा खुटलेला विकास, पाणी योजनांची बोंबाबोंब, यासह जिल्ह्यातील अनेक प्रश्न तुंबलेले आहेत. काही कामांच्या फायली मंत्रालयात धूळखात पडून आहे. त्यावर जिल्ह्याचे कारभारी आवाज उठविणार का हा खरा प्रश्न आहे.
शहरातील रस्त्यांचा ७०० कोटींचा आराखडाआमदार संग्राम जगताप यांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरातील विकास आराखड्यात समाविष्ट असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीचा ७०० कोटींचा आराखडा तयार केला आहे. यापूर्वीच्या सरकारने ३०० कोटींची घोषणा केली होती. पण, निधी मिळाला नाही. जगताप यांच्या रुपाने नगर शहराला अनेक वर्षानितर सताधारी पक्षाचे आमदार लाभले आहेत. त्यांच्याकडून नगरकरांना मोठ्या अपेक्षा आहेत.