शिर्डी : शिर्डीलगत असलेल्या निमगाव येथील भाजी विक्रेती असलेल्या कोरोनाबाधीत महिलेच्या कुटूंबातील आणखी चार जणांना लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे निमगाव येथील कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या पाच झाल्याची माहिती राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिली.
बुधवारी सायंकाळी निमगाव येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. ही महिला भाजी विक्रेती आहे. तिने शिर्डीतील साईबाबा रूग्णालयात सलग चार दिवस उपचार घेतले होते. तिचे शिर्डीतील नातेवार्इंकाकडेही वास्तव्य झाले होते. त्यामुळे या महिलेच्या कुटूंबातील पाच जण, साईबाबा रूग्णालयात उपचार घेताना संपर्कात आलेले बारा जण, शिर्डीतील नऊ नातलग व सावळेविहीर येथे उपचार करणा-या एका डॉक्टरासह २७ व्यक्तींना तपासणीसाठी नगरला पाठवण्यात आले होते.
यातील हायरिस्क असलेल्या या महिलेच्या कुटूंबातील व्यक्तींचे स्त्राव प्राधान्याने तपासण्यात आले. त्यात या महिलेचा पती, एक मुलगा, सुन व नातीचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. शुक्रवारी (दि.२९ मे) सकाळी नऊ वाजता तालुका प्रशासनाला हे अहवाल प्राप्त झाले आहेत. या महिलेच्या एका मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तो साईबाबा रूग्णालयात नोकरीस आहे. मात्र तो २० मे पासून कामावर आलेला नाही. या कुटूंबातील एक महिला शिर्डीत येवून राहिली होती. तिचा अहवाल निगेटिव्ह आला. पण तिच्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
शुक्रवारी सकाळी अहवाल प्राप्त होताच प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ प्रमोद म्हस्के, डॉ़ संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक नितीन गोकावे, सहाय्यक निरीक्षक दीपक गंधाले यांच्यासह वैद्यकीय टिमची आता पुन्हा बैठक होत आहे. यात पुढील उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा, असे आवाहन प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसिलदार कुंदन हिरे यांनी केले आहे.