अहमदनगर : विनापरवाना देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाºया चौघांना शनिवारी पोलिसांनी अटक केली. यातील दोघांना कोतवाली पोलीसांनी शहरातील बुथ हॉस्पिटलसमोरून, तर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघांना बुरुडगल्ली येथून अटक केली.कोतवाली पोलिसांनी अरशाद रशिद सय्यद (वय २२रा. फकिरवाडा दर्गा समोर, नगर) व फरमान जाकीर सय्यद (२४ रा. मुकुंदनगर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांकडून पोलिसांनी मेड इन जपान बनावटीचे पिस्टल, ६ जिवंत राऊंड व एक मोटारसायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन गोकावे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक शिवाजी नागवे, पोलीस हेड कॉन्स्टेबल रायचंद पालवे, पोलीस नाईक शरद गायकवाड, शाहिद शेख, नितीन गाडगे यांच्या पथकानेही ही कारवाई केली. शहरातील बुरूडगल्ली येथील धरती चौक येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले़ राहुल राजेंद्र पवार (वय ३५ रा. खळवाडी ता. नेवासा) व संदेश शिमोण निकाळे (वय २६ रा. धरती चौक) असे ताब्यात घेतलेल्या दोघांची नावे आहेत. यावेळी श्रीकांत उर्फ बच्चू शिरसाठ हा फरार झाला. ताब्या घेतलेल्या दोघांकडून ६१ हजार रूपये किमतीचे देशी बनावटीचे दोन गावठी पिस्तोल व ६ जिवंत काडतूस असा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश फडतरे, मन्सूर सय्यद, शंकर चौधरी, रवींद्र कर्डिले, मनोहर गोसावी, दत्ता गव्हाणे, सचिन अडबल यांच्या पथकाने कारवाई केली.
गावठी कट्टा बाळगणा-या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 12:27 PM