नेवासा : औरंगाबाद जिल्ह्यात तीन गुन्ह्यात फरार असलेल्या एका आरोपीसह चार जणांना गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूसे, दोन मॅगेजीन, दोन पल्सर दुचाकीसह अटक करण्यात आली आहे.मंगळवारी दुपारी प्रवरासंगम- गळनींब रोडवर हॉटेल विजय जवळ नेवासा पोलिसांनी ही कारवाई केली. या गुन्ह्यात शिवनाथ निवृत्ती दुबीले (वय- ३२ रा. शेंदुरवादा, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), आत्तार जमादार शेख (वय- २८, रा. नवीन कायगाव, ता. गंगापुर), संतोष उर्फ पिंटू विष्णु मोहिम (वय- ४०), अनिल भाऊसाहेब वाघमारे (वय- ३८ दोघे रा. प्रवरासंगम ता.नेवासा) या चौघांना अटक करण्यात आलेली आहे.सहाय्यक पोलिस निरिक्षक शरद गोर्डे यांच्या पथकातील पोलिस उपनिरिक्षक प्रमोद भिंगारे, हे.कॉ.साळवे, पो.ना.सुहास गायकवाड, हे.कॉ.हनुमंत गर्जे, बाळासाहेब नागरगोजे, देविदास खेडकर, संभाजी गर्जे, अंकुश पोटे, प्रताप दहिफळे यांनी सापळा लावत कारवाई केली. गुन्ह्यातील एक गावठी कट्टा, पाच जिवंत काडतुसे व दोन मॅगेजीन तसेच दोन दुचाकी असा एक लाख दोन हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून चार जनांविरोधात आर्मअँक्ट सह सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी दुबीले याच्यावर आरंगाबाद जिल्ह्यात अपहरण, गोळीबार, मारामा-या असे विविध प्रकारचे तीन गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गावठी कट्ट्यासह चार जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2018 10:45 AM