कोपरगाव : शहरात रविवारी प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व राजमुद्रा प्रतिष्ठान यांचे भाजी मंडई ,गुरुद्वारा समोर,धारणगाव रोड येथे मिरवणूक मागे-पुढे घेण्यावरुन चर्चा सुरू होती. तितक्यात पोलीस प्रशासनाने मंडळातील सदस्यावर लाठीचार्ज केला. यामध्ये प्रगत शिवाजी रोड तरुण मंडळातील चार सदस्यांना जबर दुखापत झाली असून त्यांच्यावर कोपरगाव नगरपरिषदेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आला .
रविवारी शहरात सर्वच गणेश मंडळानी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी वाजत गाजत मिरवणूक काढली होती. त्यामध्ये शहरातील मानाचे समजले जाणारे प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ व राजमुद्रा प्रतिष्ठान यांची मिरवणूक सायंकाळी 5 च्या सुमारास भाजी मंडई, गुरुद्वारा समोर, धारणगाव रोड येथे एकत्र आल्या त्यावेळी मिरवणूक माघे पुढे घेण्यावरून दोन्ही मंडळातील सदस्य चर्चा करत होते. तितक्यात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर व त्यांच्या पथकाने त्यांच्यावर लाठीचार्ज केला यामध्ये प्रगत शिवाजीरोड संयुक्त तरुण मंडळातील सदस्य विजय चव्हाण यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने १० टाके पडले,अमृत काकड याच्या डोळ्याला जखम झाली तर वैभव आढाव व लक्ष्मण बागुल यांना पाठीला व कंबरेला चांगलीच दुखापत झाल्याने त्याच्यावर शहरातील ग्रामीण रुग्णालय व एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आला असून मंडळाच्या वतीने शहरातील अहिंसा स्तंभाजवळ या घटनेचा निषेध करण्यात आला, असे मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
मिरवणुकीदरम्यान आम्ही दोन्ही मंडळातील सदस्य शांतेच्या मार्गाने चर्चा करत होतो तितक्यात पोलीस प्रशासनाने आमच्यावर लाठीचार्ज केला.आमचे मंडळ हे कोपरगाव गावठाणातील असून गणेश विसर्जनासाठी गोदावरी नदी काही मिनिटांच्या अंतरावर आहे.परंतु पोलीस प्रशासन आम्हाला विरुद्ध दिशेने जवळपास एक ते दीड किलोमीटर लांब मिरवणूक काढायला सांगते.वेळोवेळी शांतता कामिटीच्या बैठकीत गेल्या आठ वर्षापासून पोलीस प्रशासनाला आम्ही या विषयी विनंती करत आहोत. विशेष म्हणजे दोन मंडळात चर्चा सुरु असताना आमच्याच मंडळातील सदस्यावर लाठीचार्ज करण्यात आला. परंतु पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करण्याऐवजी आमच्यावरच लाठीचार्ज केला. त्यामुळे आम्ही न्याय तरी कोनाकडे मागायचा. - वैभव आढाव, मिरवणूक प्रमुख, प्रगत शिवाजी रोड संयुक्त तरुण मंडळ, कोपरगाव.
- या संदर्भात कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राकेश मानगावकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही .