साईदर्शनाला जाणाऱ्या कारचा अपघात, चार भाविक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 08:26 PM2022-05-15T20:26:10+5:302022-05-15T20:44:56+5:30
Accident Case : मृतांमध्ये दोन पुरुष एक महिला व एका बालकाचा समावेश आहे. सर्व भाविक मध्यप्रदेशमधील असल्याचे समजते.
राहुरी-देवळाली प्रवरा (जि.अहमदनगर) : नगर-मनमाड राज्यमार्गावर रविवारी दुपारी चारच्या सुमारास एसटी बस व कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात सात महिन्यांच्या चिमुकलीसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, कारचा अक्षरश: चक्काचूर झाला होता. रविवारी दुपारी साडेतीन वाजता नगर-मनमाड महामार्गावरील राहुरी जवळ गुहापाट येथे हा अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्य आहेत. मृतांमध्ये सासू-सून, एक बालक आणि चालकाचा समावेश आहे.
मध्य प्रदेशातील खरगोन येथील तारे कुटुंबातील सदस्य कारने शिर्डीहून पुण्याकडे चालले होते. कार (क्रमांक एम. पी. १०-सी. बी.- १२३६) ही गुहा पाटाजवळ आली असताना, नगर-सटाणा ही एसटी बस (एम. एच.-१४, ४५०२) यांची समोरासमोर जोरदार टक्कर झाली. यात कारचा चक्काचूर झाला. कारमधील रंजना दीपक तारे (वय ५५), प्रतीक्षा विपुल तारे (वय ३५), लुणय विपुल तारे (वय ७), चालक जगदीश राठोड (वय ३५) हे जागीच ठार झाले. अपघातात कारचा चक्काचूर झाला. विपुल दीपक तारे (रा.पुणे) हे अपघातात जखमी असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. विपुल हा कुटुंबातील एकमेव सदस्य बचावला आहे.
चालक ताब्यात
शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. बस चालक भाऊसाहेब कुंडलिक गोराणे (सटाणा डेपो) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. या भागात रस्त्याच्या रुंदीकरणाचे व मजबुतीकरणाचे काम चालू आहे. त्यामुळे सुरू झालेली अपघाताची मालिका सुरूच आहे. तीन महिन्यांत पंधरापेक्षाही अपघात झाले असून, १५ पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. ठेकेदार कंपनीने आवश्यक तेथे सूचना फलक लावलेले आहेत.
स्थानिकांचे मदतकार्य
घटना घडताच येथील स्थानिक नागरिक दिलीप बोरुडे, शशी वाबळे, राजेंद्र बोरुडे, विवेक लांबे, ओहोळ, अमर वाबळे, वैभव लांबे, सागर लांबे, सूरज ओहोळ, शशी कोळसे आदींनी मदतकार्य केले. अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक मधुकर शिंदे, सज्जन नाहेडा, दिनकर गर्जे, लक्ष्मण बोडखे, रोहित पालवे, सोमनाथ जायभाये, गणेश लिपणे, रवींद्र कांबळे आदी पोलिसांनी मदत कार्य करून, उशिरापर्यंत वाहतूक सुरळीत केली. अपघातसमयी साई प्रतिष्ठाण, शिवबा प्रतिष्ठाण, भीमतेज तरुण मंडळ, १०८ नंबरची रुग्णवाहिकाही तत्काळ घटनास्थळी पोहोचली..