प्रशांत शिंदे ,अहमदनगर- राज्य सरकारने अर्थसंकल्पात 'मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजने'ची घोषणा केली होती. या योजनेचे शासकीय परिपत्रक जारी करण्यात आले असून जिल्ह्यातील चार तीर्थस्थाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शिर्डीचे साईबाबा मंदीर, शनी शिंगणापूरचे शनी मंदीर, पाथर्डीचा भगवानगड, सिद्धटेकचे सिद्धविनायक मंदिर यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील सर्व धर्मियांमधील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत, त्यांना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेद्वारे भारतातील तीर्थक्षेत्रांना भेट देता येणार आहे. या योजनेमध्ये पात्र व्यक्तींना देव दर्शन करता येणार आहे. यामध्ये प्रवासाचा, राहण्याचा आणि भोजनाचा खर्च सरकार उचलणार आहे. यामध्ये देशातील ७३ तीर्थस्थळे तर राज्यातील ६४ तीर्थस्थाळांचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेतील पात्र व्यक्तीला एकदाच लाभ घेता येणार आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती ३० हजार ठे्यात आली आहे. यामध्ये प्रत्यक्ष, प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महाराष्ट्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे. वय वर्षे ६० व त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावा तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा अधिक नसावे, अशी अट घालण्यात आली आहे.