अहमदनगर : नगर तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर यातील आरोपींचे अनेक अनैतिक कृत्य समोर आले आहेत. पैशांचा हव्यास आणि गुन्हेगारी प्रवृत्तींच्या तरुणांना हेरून या महिलेने स्वत:ची एक टोळीच तयार केली होती. बंगल्यात आलेल्या पुरुषांचे अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करून त्यांना दमदाटी व मारहाण करत पैसे उकळणे, अशी जबाबदारी या तरुणांवर होती.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेले महेश बागले आणि सागर खरमाळे यांच्या विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. अमोल मोरे याचे केडगाव चौकात किराणा दुकान असून तो आरोपी महिलेचा खास पंटर आहे. सचिन खेसे याचेही नगर तालुक्यातील हमीदपूर येथे किराणा दुकान आहे. महिलेच्या जाळ्यात अडकलेला क्लासवन अधिकारी हा हमीदपूर येथीलच आहे. हे चौघे अनेक दिवसांपासून एकमेकांच्या संपर्कात होते. २६ एप्रिल रोजी सदर महिलेने व्यावसायिकाला घरी बोलविल्यानंतर त्याचे अमोल मोरे याने व्हिडिओ चित्रीकरण केले होते. एक मे रोजी क्लासवन अधिकाऱ्याला अडकविण्यात महेश बागले, सागर खरमाळे व सचिन खेसे यांचा सहभाग होता. समोरील व्यक्तीकडून मिळालेले पैसे हे पाच जण आपसात वाटून घेत होते. यात महिलेचा वाटा जास्त असायचा.
--------------------
व्हिडिओ मिळताच लुटमार
महिलेच्या बंगल्यात आलेल्या पुरुषाला सदर महिला शरीर संबंध करण्यास भाग पाडायची. यावेळी घरातील जिन्यात व बाथरूममध्ये लपून असलेले तिचे साथीदार अश्लील व्हिडिओ चित्रीकरण करायचे. व्हिडिओ पूर्ण होताच त्या व्यक्तीवर हे तरुण हल्ला करून त्याच्याकडील पैसे व दागिने हिसकावून घ्यायचे.
----------------------
सचिन खेसे चार दिवस पोलीस कोठडीत
क्लासवन अधिकाऱ्याला खंडणी मागितल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील अटक केलेल्या आरोपीला बुधवारी जिल्हा न्यायालयाने २२ मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सदर महिला व अमोल मोरे यांची गुरुवारी पोलीस कोठडी संपणार आहे.
-------------
चर्चा अनेकांची मात्र तक्रार नाही
महिलेच्या जाळ्यात अडकलेल्या अनेकांच्या नावाची चर्चा आहे. मात्र बदनामीच्या भीतीपोटी हे लोक पोलिसांकडे तक्रार देण्यास घाबरत आहेत. नगर शहरातील एक प्रतिष्ठित व्यक्तीही याच हनीट्रॅपची शिकार ठरल्याची चर्चा आहे. तक्रारदार समोर आल्यानंतर या गुन्ह्याची व्याप्ती वाढणार आहे. या टोळीने ज्यांना खंडणी मागितली आहे त्यांनी तक्रार देण्यास पुढे यावे, असे आवाहन या गुन्ह्याचे तपासी अधिकारी राजेंद्र सानप यांनी केले आहे.