जामखेड : कर्जत, जामखेड, करमाळा तालुक्यात नरभक्षक बिबट्यास पकडण्यासाठी पोलीस व वनविभाग यंत्रणास तात्काळ घटनास्थळी अधिक संख्येने जाता यावे यासाठी आ. रोहित पवारांनी चार वाहने उपलब्ध करून दिली आहेत.
कर्जत, करमाळा, जामखेडच्या यंत्रणेकडून संयुक्तरीत्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अधिकच्या गस्ती घालण्याचे काम सुरू आहे. ज्या ठिकाणी बिबट्या प्रवणक्षेत्र आहे. अशा ठिकाणी भयभीत नागरिकांसाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडून फटाकेही पुरवण्यात येत आहेत. कर्जत- जामखेडसाठी ४० हजार फटाके देण्यात येत आहेत. गस्त घालण्यासाठी तालुक्यातील रेहकुरी आणि शेगुड या ठिकाणी वनविभागाच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना पवार यांच्याकडून जेवणाची सोय करण्यात आली. बिबट्याला पिंजऱ्यात पकडण्यात अडचणी येत असतील तर त्याला ठार मारण्याचे आदेश वनमंत्री संजय राठोड यांनी दिले असल्याची माहिती रोहित पवार यांनी दिली.