घारगाव : शिर्डीहून आळंदी येथे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून झालेल्या अपघातात चार वारकरी ठार तर आठ वारकरी जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी (दि.०३) दुपारी चार वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातून जाणाऱ्या पठार भागातील नाशिक-पुणे महामार्गावर १९ मैल (खंदरमाळवाडी) परिसरात घडला. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
ताराबाई गंगाधर गमे (वय ५२, रा. कोऱ्हाळे, ता. राहाता), भाऊसाहेब नाथा जपे (वय ५०, रा. कनकुरी, ता. राहाता), बबन पाटीलबा थोरे (वय ६५, रा. द्वारकानगर, शिर्डी, ता. राहाता), बाळासाहेब अर्जुन गवळी ( वय ५०, रा. मढी, ता. कोपरगाव) अशी अपघातातील मयतांची तर बिजलाबाई अशोक शिरोळे (वय ५५, रा. वाकडी, ता. राहता), राजेंद्र कारभारी सरोदे (वय ५५, रा. मढी, ता. कोपरगाव), भाऊसाहेब दशरथ गायकवाड (वय ६९, रा. वेस, ता. कोपरगाव), ओंकार नवनाथ चव्हाण (वय १७, रा. मढी खुर्द, ता. कोपरगाव), निवृत्ती पुंजा डोंगरे (वय ७५, रा. पंचाळे, ता. सिन्नर, जि. नाशिक), शरद सचिन चापके (वय १७, रा. परभणी), अंकुश ज्ञानेश्वर कराळे (वय ३५, रा. ज्ञानेश्वर मंदिर, शिर्डी), मीराबाई मारुती ढमाळे (वय ६०, रा. दुशिंगवाडी, वावी, ता. सिन्नर, जि. नाशिक) अशी जखमींची नावे आहेत. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
शिर्डीपासून काही अंतरावर निमगाव येथे संत ज्ञानेश्वर महाराजांचे मंदिर आहे. तेथून दरवर्षी शिर्डी ते आळंदी पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन केले जाते. यात शिर्डी आणि परिसरातील गावांमधून वारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात. ही दिंडी शिर्डीहून संगमनेर मार्गे नाशिक-पुणे महामार्गाने आळंदी येथे जात होती, त्यावेळी पठार भागातील १९ मैल (खंदरमाळवाडी) येथे पाठीमागून येणारा भरधाव येणार कंटेनर अचानक दिंडीत घुसला. वारकऱ्यांना कंटेनरची जोराची धडक बसली, त्यानंतर दिंडीतील रथाला देखील हा ट्रक धडकला.