याप्रकरणी शिरसाठवाडी येथील ग्रामसेवक अर्चना विठ्ठल सानप यांनी फिर्याद दिली आहे. शिरसाठवाडी येथे २५ ऑगस्ट रोजी एका अल्पवयीन मुलीचा विवाह झाल्याची माहिती मुंबई येथील मर्जी संघटनेचे संस्थापक मंगेश सोनवणे यांना मिळाली होती. सोनवणे यांनी या संदर्भात नगरची चाइल्डलाइन, बालकल्याण समिती तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना माहिती दिली. त्यानंतर याप्रकरणी चाइल्डलाइनचे सदस्य प्रवीण कदम यांनी शिरसाठवाडी येथील ग्रामसेवक, सरपंच व पाथर्डी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी या विवाहाची खात्री केली तेव्हा मुलीचे वय अवघे चौदा वर्षे असल्याचे समोर आले. त्यानंतर ग्रामसेविका सानप यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अद्यापपर्यंत कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
-------------------------
बालविवाह रोखण्यासाठी गावपातळीवर ग्रामसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आदींची स्थानिक समिती कार्यरत असते. कुठे बालविवाह होत असेल अथवा झाला असेल तर दोषींविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची जबाबदारी या समितीची असते. शिरसाठवाडी येथे बालविवाहाची घटना स्थानिक समितीला कशी समजली नाही. याप्रकरणी कारवाई होण्यासाठी आम्हाला मुंबईतून पाठपुरावा करावा लागला. याप्रकरणी कारवाईसाठी चाइल्डलाइनेही महत्त्वाची भूमिका निभावली. त्यानंतर दोषींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता या प्रकरणाचा सविस्तर तपास करून पोलिसांनी सर्व दोषींवर कारवाई करणे अपेक्षित आहे.
- मंगेश सोनवणे, संस्थापक, मर्जी, मुंबई