कोपरगाव : सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने पॅरासिटामॉल औषधनिर्माणशास्त्र फार्मा डिव्हिजनमध्ये नेत्रदीपक पावले टाकली आहेत. अद्ययावत संशोधन प्रयोगशाळेची निर्मिती केली आहे. पुढील सहा वर्षांत कोल्हे कारखाना आत्मनिर्भर भारत संकल्पनेत देशातील सहकारी तत्त्वावरील पहिल्या दहा कारखान्यांमध्ये सर्वोच्च स्थानी राहिल, असा विश्वास संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी व्यक्त केला आहे.
कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.२७) कारखाना कार्यस्थळावर ऑनलाइन पद्धतीने पार पडली. त्यात २,२०० पेक्षा जास्त सभासद ऑनलाइन उपस्थित होते. प्रारंभी, प्रभारी कार्यकारी संचालक राजेंद्र सूर्यवंशी व सर्व संचालक मंडळाने उपस्थितांचे स्वागत केले. अहवाल विषयपत्रिकेवरील सर्व चौदा विषयांना सभासदांनी रीतसर सूचना व अनुमोदन देऊन टाळ्यांच्या गजरात त्यास मंजुरी देण्यात आली.
कोल्हे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पट्रोलियममंत्री धमेंद्र प्रधान यांनी देशातील साखर कारखानदारीसाठी इथेनॉलनिर्मिती व खरेदी धोरण घेऊन चांगल्या प्रकारे मदत केली. स्व. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील या मंडळींनी सहकाराचा समर्थ पाया रोवला. एकेकाळी खाजगी साखर उद्योगाशी दोन हात करत सहकारी साखर कारखानदारीने राज्याला प्रगतिपथावर नेण्याचा प्रयत्न केला; पण आज त्याच सहकारासमोर खाजगीचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यात सहकार मोडकळीस येईल तेव्हा राजकीय जोडे बाजूला ठेवून सर्वांनी आत्मचिंतन करून या उद्योगाला वाचविण्यासाठी पुढे येऊन राज्य शासनानेदेखील मोठे पॅकेज देऊन सहकारी साखर कारखानदारी वाचवावी, असेही आवाहनही कोल्हे यांनी केले आहे.
सभेदरम्यान, युवानेते विवेक कोल्हे यांची जिल्हा बँकेच्या संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाल्याबद्दल संचालक मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
..............