लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींची सोमवारी ( दि.१८ ) मतमोजणीची प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या गटाने आ. आशुतोष काळे यांच्या ताब्यातील मागील तब्बल १२ ग्रामपंचायतींत सत्तांतर करून सर्वाधिक २० ग्रामपंचायतींत सत्ता काबीज केली. विद्यमान आ. काळे यांची मोठ्या प्रमाणात पिछेहाट होऊन फक्त ६ ग्रामपंचायतींची सत्ता राखता आली. तर कोकमठाण ग्रामपंचायतीत शिवसेनेचे बाळासाहेब जाधव तर राष्ट्रवादी मिळून महाविकास आघाडीने कोल्हे यांची गेल्या अनेक वर्षाची सत्ता मोडीत काढून आपला झेंडा रोवला. तर दुसरीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून असलेल्या संवत्सर ग्रामपंचायतीची सत्ता राखण्यात राजेश परजणे यांना यश आले. या ग्रामपंचायतीमध्ये परजणे गट १४, कोल्हे गट २ तर काळे गट फक्त १ असे उमेदवार निवडून आले.
कोपरगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाल्यापासून सर्वच मातब्बर नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. विशेषतः आमदार आशुतोष काळे यांनी या निवडणुकीत अगदीच उमेदवार निश्चित करण्यापासून तर थेट प्रचाराला प्रत्येक गावात, प्रत्येक प्रभागात जाऊन प्रचार केला. परंतु, सर्वच ग्रामपंचातींवर झेंडा फडकविण्याचे राहिलेच. याउलट ताब्यात असलेल्या १२ ग्रामपंचायती टिकवणे मुश्कील होऊन बसले. व त्या सर्व ठिकाणी आपला झेंडा फडकवला. पुन्हा एकदा धूर्त राजकारण, राजकारणातील जुने खेळाडू, मोठा अनुभव व विश्वासू कार्यकर्त्याची फळी याची प्रचीती दाखवून देत कोल्हे गटाने विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काळे गटाला सपशेल धूळ चारत मोठा विजय मिळवून २० ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या तसेच राहाता तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीवर विजय मिळवत मोठे यश मिळविले.