अहमदनगर : जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार अशुतोष काळे यांच्या गटाचेच चारही अर्ज बुधवारी मागे घेण्यात आले असून, भाजपाच्या आमदार स्नेहलता कोल्हे यांचे चिरंजीव विवेक कोल्हे हे बिनविरोध झाले आहेत. तसेच श्रीगोंद्यातून राहुल जगताप यांच्यासाठी राजेंद्र नागवडे यांनी, तर पारनेरमध्ये उदय शेळके यांच्यासाठी आमदार नीलेेश लंके यांनी माघार घेतली. मधुकर नवले यांनी बिगर शेती व शेतीपूरक या दोन्ही मतदारसंघातून अर्ज मागे घेतले आहेत.
जिल्हा बँक निवडणुकीसाठी माघारीसाठीचा उद्या गुरुवारी अखेरचा दिवस आहे. कोपरगाव तालुक्यातील आमदार अशुतोष काळे गटाचे देवेंद्र रोहमारे, अलकादेवी जाधव, किसन पाडेकर या चौघांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदारसंघातून आता बिपीन कोल्हे यांचे चिरंजीव विवेक यांचाच अर्ज राहिला आहे. आमदार अशुतोष काळे ज्या शेतीपूरक मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, त्या मतदारसंघातून संगमनेरचे माधवराव कानवडे, राजेंद्र नागवडे, गणपत सांगळे, यांच्यासह सुभाष गुंजाळ, संभाजी गावंड, उत्तम चारमळ, केशव भवर, अरुण येवले यांनी अर्ज मागे घेतले आहेत. शेतीपूरकमधून श्रीगोंद्याचे दत्ता पानसरे यांच्यासह १८ जणांचे अर्ज आहेत. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून राजेंद्र नागवडे यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. तसेच राहुल जगताप यांच्या पत्नी प्रणिती यांचाही अर्ज मागेे घेण्यात आला आहे. त्यामुळे या मतदारसंघात राहुल जगताप व वैभव पाचपुते हे दोघे मैदानात आहेत. राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी आपला विकास सेवा सहकारी संस्था मतदासंघातून अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे पारनेरमधून राष्ट्रवादीकडून उदय शेळके हे मैदानात आहेत. भानुदास मुरकुटे यांनी इतर मागास प्रवर्गातून अर्ज मागे घेतला आहे. संगमनेर तालुक्यातून रंगनाथ फापाळे व दिलीप वर्पे यांनीही माघार घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात कानवडे यांच्यासह दिनकर गायकवाड व रमेश मगर यांचे अर्ज राहिले आहेत. यापूर्वी विकास सेवा सहकारी संस्थांमधून अण्णासाहेब म्हस्के, आमदार मोनिका राजळे, चंद्रशेखर घुले, जगन्नाथ राळेभात आणि कोल्हे बिनविरोध झाले आहेत. यामध्ये भाजपाचे चार, तर राष्ट्रवादीच्या एका जागेचा समावेश आहे. तसेच इतर शेतीपूरक, बिगर शेती, इतर मागास प्रवर्ग, महिला राखीव, अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे इच्छुकांना थोपविण्याचे मोठे आव्हान नेत्यांसमोर आहे.
....
३० जणांची माघार, १६८ अर्ज दाखल
जिल्हा बँक निवडणुकीसाठी १९८ उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यापैकी ३० जणांची माघार घेतली असून, विविध मतदारसंघांतून १६८ अर्ज दाखल आहेत. विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ९ जागांसाठी निवडणूक होणार की बिनविरोध, याबाबतचा निर्णय गुरुवारी होईल.
..
या तालुक्यात झाला समझोता
विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून प्रत्येक तालुक्यासाठी एक जागा आहे. जिल्ह्यात १४ तालुके असून, शेवगाव, कोपरगाव, पाथर्डी, राहाता, जामखेड तालुक्यात समझोता झाला. त्यामुळे पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत.
...
या तालुक्यांत खलबते सुरू
जिल्हा बँकेच्या विकास सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून श्रीरामपूर तालुक्यातून करण ससाणे व भानुदास मुरकुटे, तर श्रीगोंद्यात राहुल जगताप व वैभव पाचपुते यांच्यात समझोता करण्यासाठी खलबते सुरू आहे. पारनेर तालुक्यात राष्ट्रवादीने उदय शेळके यांच्यासाठी ताकत लावली आहे. राहुरी तालुक्यातून मंत्री प्राजक्त तनपुरे व अरुण तनपुरे यांच्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच संगमनेरमध्ये कानवडे यांच्यासाठी मंत्री थोरात प्रयत्नशील आहेत. नेवासा तालुक्यात मंत्री शंकरराव गडाख व लंघे यांचे अर्ज आहेत. कर्जतमधून अंबादास पिसाळ यांच्यासह मीनाक्षी साळुंके यांचा अर्ज असून, ही जागा बिनविरोध करण्यासाठी जोर बैठका सुरू आहेत.
...
नगर तालुक्याकडे लक्ष
नगर तालुक्यातून माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्यािविरोधात महाविकास आघाडी एकवटली आहे. तालुक्यातून कर्डिले यांच्यासह पद्मावती म्हस्के व सत्यभामाबाई बेरड यांचे अर्ज आहेत. त्यामुळे नगर तालुक्यात काय होते, याकडे राजकीय वतुर्ळाचे लक्ष आहे.
...
जिल्हा बँकेतून यांची माघार
विकास सेवा संस्था-जामखेड- सुरेश भोसले, कोपरगाव- अलकादेवी जाधव, किसन पाडेकर, देवेंद्र रोहमारे, बिपीन कोल्हे, पारनेर- नीलेश लंके, मथूराव वाघ, संगमनेर- रंगनाथ फापाळे, दिलीप वर्पे, श्रीगोंदा- राजेंद्र नागवडे, प्रणिती जगताप, श्रीरामपूर- कोंडीराम उंडे.
..
बिगर शेती
भानुदास मुरकुटे, किरण पाटील, मधुकर नवले, प्रियंका देशमुख, केशव भवर.
..
शेतीपूरक
भानुदास मुरकुटे, सुभाष गुंजाळ, माधव कानवडे, गणपत सांगळे, मधुकर नवले, राजेंंद्र नागवडे, संभाजी गवंड, उत्तम चरमळ, केशव भवर, अरुण येवले.
...
इतर मागास प्रवर्ग
भानुदास मुरकुटे, केशव भवर, विलास शिरसाठ.