शिर्डी : सध्या नि:शुल्क असलेल्या साईसंस्थान प्रसादालयात भोजनासाठी नाममात्र शुल्क आकारणे आवश्यक आहे. त्याऐवजी येथील मुलांना संस्थानच्या माध्यमातून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत करण्याचा मानस खासदार डॉ़ सुजय विखे यांनी व्यक्त केला़.येत्या सोळा महिन्यानंतर सुरू होणारे साईसंस्थान स्थापनेचे शताब्दी वर्ष थाटात साजरे करू. मूलभूत समस्यांबरोबरच शहर सौंदर्यीकरण व भाविकांचे वास्तव्य वाढविण्यासाठी मनोरंजनाच्या सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रीत करू, अशी ग्वाहीही विखे यांनी दिली़. शिर्डी विधानसभा मतदार संघातील भाजप-सेना युतीचे उमेदवार राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ विखे यांनी शहरातील विविध प्रभागात बैठका घेऊन नागरिकांशी थेट संवाद साधला़. या बैठकांमध्ये भाजप-सेनेचे जुने-नवे सर्वच कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत़. यावेळी नगराध्यक्षा अर्चना कोते, उपनगराध्यक्ष मंगेश त्रिभुवन, भाजपाचे राजेंद्र गोंदकर, शिवाजी गोंदकर, नितीन कोते, शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते यांच्यासह संबंधित प्रभागाचे नगरसेवक उपस्थित होते़. यावेळी नागरिकांनी विखे यांच्यासमोर विविध समस्या मांडल्या. समस्या मार्गी लावण्याबरोबरच शिर्डीसह मतदारसंघात प्रत्येकाला हक्काचे घर देण्यासाठी प्रयत्न आहे. येत्या सोळा महिन्यानंतर येणाºया संस्थान शताब्दी वर्षात विविध उपक्रम राबवू. त्यानिमित्ताने विविध योजना मार्गी लावू. देश-विदेशातून येणारा भाविक सार्इंबरोबरच शहराच्याही प्रेमात पडेल, असा शहराचा चेहरामोहरा बदलू. भाविकांच्या मनोरंजनासाठी थीम पार्कसारखे मोठे प्रकल्प उभारल्यास भाविकांचा येथील मुक्काम वाढेल. त्यातून अर्थकारणालाही उभारी येईल. मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़. संस्थानातील कामगारांचे प्रश्न, परिसरातील शेतकºयांचे प्रश्न, व्यावसायिकांच्या प्रश्नातही आपण लक्ष घालून त्याची सोडवणूक करू, अशी ग्वाही खासदार डॉ़ विखे यांनी दिली़. यंदा निवडणूक जिंकण्याचे नाही तर विक्रमी मते मिळवण्याचे उद्दिष्ट्य आहे, असेही विखे म्हणाले.
संस्थानमध्ये शिक्षण मोफत हवे-सुजय विखे; शिर्डीत राधाकृष्ण विखे यांच्या प्रचारार्थ बैठका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 3:37 PM