कर्जत : कोरोनाबाधित असूनही कर्जत शहरात मुक्त संचार करणाऱ्या दोघांना पोलीस व नगरपंचायतच्या पथकाने ताब्यात घेऊन गायकवाडी येथील कोरोना केअर सेंटरमध्ये दाखल केले आहे. प्रशासनाने दोघांविरोधातही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. एक जण किराणा घेत होता, तर दुसरा चौकात फिरत होता.
कोराेनाबाधित असूनही दोघे जण कर्जत शहरात फिरत आहेत, अशी गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना मिळाली होती. त्यानंतर यादव यांनी ही माहिती नगरपंचायतला दिली. काही पोलीस कर्मचारी व नगरपंचायतच्या पथकाने त्या दोघांचा शोध सुरू केला. त्यातच दुपारी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, नगर परिषद मुख्याधिकारी गोविंद जाधव, सपोनि सुरेश माने, नगरपंचायतीचे कर्मचारी राकेश गदादे, विलास शिंदे, पोलीस जवान गाडे, बळीराम काकडे, नितीन नरोटे, मनोज लातूरकर शहरात सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणारे व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करत होते. त्याचवेळी दुपारी शहरातील भांडेवाडी येथील चौकात एक व्यक्ती विनाकारण फिरताना आढळली. त्याने मास्कही लावलेला नव्हता. त्या व्यक्तीची अधिक चौकशी केली असता तो कोरोनाबाधित असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका बोलावून त्याला गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले.
दुसरी व्यक्ती काळदाते कॉम्प्लेक्स जवळच्या एका किराणा दुकानात किराणा साहित्य घेत होती. त्या व्यक्तीकडे या पथकाने चौकशी केली. यावेळी ती व्यक्तीही कोरोनाबाधित असल्याचे समोर आले. या व्यक्तीलाही पोलिसांनी गायकरवाडी येथील कोविड सेंटरमध्ये दाखल केले. दोघांवरही कर्जत पोलीस ठाण्यात पोलीस काॅन्स्टेबल मनोज लातूरकर यांच्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८, २६९, २७० व साथरोग अधिनियम कायदा कलम ३ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
---
इतरांच्या जिवाशी खेळू नका..
कोरोनाबाधित असूनही सार्वजनिक ठिकाणी फिरणे अत्यंत चुकीचे आहे. असे करून इतरांच्या जिवाशी खेळू नका. यापुढेही पुन्हा, असे निदर्शनास आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिला आहे.
---
१२ कर्जत कोरोना
कर्जत शहरातील एका किराणा दुकानात किराणा साहित्य खरेदी करताना कोरोनाबाधित व्यक्तीला पोलीस व नगरपंचायतीच्या पथकाने सोमवारी पकडले.