अहमदनगर : ग्रामीण भागातील जनतेची मधूमेह या छुप्प्या आजाराबाबत जागृती व्हावी, वेळीच या आजारांवर योग्य उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागातील १८ वर्षापुढील सर्व नागरिकांची मधूमेहाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या पुढाकारातून पुण्याच्या चेलाराम डायबिटीक इन्स्टिट्यूटची ही मोफत तपासणी करणार असून त्याच सोबत मधूमेहग्रस्तांना १५ दिवस मोफत औषध उपचार करणार आहेत. जिल्हा परिषदेत पाच महिन्यांत बदलून आलेले मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, कुपोषण आणि हागणदारी मुक्तीसाठी विविध नाविण्यपूर्ण योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १८ वर्षापुढील नागरिकांची मधूमेहाची चाचणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात या आजाराचे निदान करणे, औषधउपचार करणे आणि काळजी घेण्याची साधणे नसल्याने यासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. पुण्यातील चेलराम फाऊंडेशन यासंदर्भात मोफत काम करत असून त्यांनी नगरमध्ये काम करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी नवाल यांची भेट घेतली. त्यानंतर जिल्ह्यात ही योजना राबविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात संबंधीत संस्थाचे प्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागातील अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी आणि नवाल यांची एकत्रीत बैठक झाली असून हा कार्यक्रम अंतिम करण्यात आला आहे. येत्या ३ जूनपासून या तपासणीला सुरूवात होणार असून संबंधी फाऊंडेशच्या कर्मचार्यांसोबतच जिल्ह्यातील त्या त्या तालुक्यातील आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी या तपासणी मोहिमेत सहभागी होणार आहेत. (प्रतिनिधी) असा असणार कार्यक्रम जिल्ह्यात टप्प्या टप्प्याने तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. यात आशा स्वयंसेविकांची मदत घेण्यात येणार असून त्यांच्या मार्फत सर्वेक्षण करून रात्री लघूशंकेचा त्रास असणार्या, अतिरिक्त भूक लागणार्यांची यादी, मधूमेहाचा संशय असणार्यांची यादी तयार करून त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त आरोग्य अधिकारी डा. संदीप सांगळे यांनी दिली. संस्थेच्यावतीने आठवड्यातून चार दिवस तपासणी मोहिम राबविण्यात येणार असून यात वजन, उंची, रक्तदाब, लघवीतील आणि रक्तातील साखरेचे प्रमाण शोधण्यात येणार आहे. तसेच संबंधीतांचे डोळे आणि हृदयाची तपासणी करणार आहे. यासाठी संस्थेचा अद्ययावत, यंत्र सामुग्रीचा फिरता दवाखाना आहे. तो प्रत्येक गावात जाणार आहे. यात २ नर्स, एक वैद्यकीय अधिकारी आणि सोबत जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. चेलराम ही संस्था मुळची मुंबईची असून पुण्यात त्यांचे मधूमेहाचे हॉस्पिटल आहे. या संस्थेने यापूर्वी पुण्यातील ३५० गावातील १८ हजार ५०० लोकांची मोफत मधूमेहाची तपासणी केलेली आहे. ग्रामीण भागात वर्षानोवर्ष अनेकांना आपल्याला मधुमेहाचा त्रास असल्याचे माहित नसते आणि जेव्हा हे लक्षात येते, तेव्हा वेळ निघुन गेलेली असते. यासाठी चेलाराम संस्था कार्यरत करत आहेत. -डॉ. प्रसन्न ढोरे, प्रकल्प समन्वयक.
मधूमेहाची होणार मोफत तपासणी
By admin | Published: June 02, 2014 12:22 AM