अहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी दोन वेळच्या मोफत जेवणाची सोय करण्यात आली असून, एक हजार जणांना दोनवेळचे जेवण पोहोच करण्यात येईल, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली. शहरातील टिम ५७ फॅमिली पान पकवान यांच्या एक हजार कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना दोन वेळचे जेवण पार्सल स्वरूपात देण्याच्या सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्वप्नील पर्वते, नानासाहेब साळवे, सोनू घेमुड, शुभम दळवी, हर्षल काळभोर, अनिल आनारसे, अभिषेक देशमुख, प्रशांत काळभोर, राहुल सोनवणे आदी उपस्थित होते.
यावेळी स्वप्निल पर्वते म्हणाले की, कोरोना बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना सकस आहार टीम ५७ च्या माध्यमातून दिला जाणार आहे. ग्रामीण भागातील कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची वाढलेल्या लॉकडाऊनमध्ये जेवणाची गैरसोय होऊ नये, यासाठी आ. संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली टीम ५७ च्या माध्यमातून गरजूंना मोफत सकस आहार देण्यात येणार आहे. नातेवाइकांनी सकाळी ९ ते ११ यावेळेत संपर्क साधावा. यावेळेत संपर्क साधणाऱ्यांना दुपारी व सायंकाळी, अशा दोनवेळेत जेवण पोहोच केले जाईल.