शेवगाव: तालुका राष्ट्रवादी काँग्रेस, दूध उत्पादक सहकारी संघ, खासगी दूध संकलन संस्था व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शेवगाव शहरातील क्रांती चौकात गुरूवारी दुधाचे वाटप करून दूध दरवाढीच्या आंदोलनास पाठिंबा दिला.दूध उत्पादकांच्या मागण्या तातडीने मंजूर झाल्या नाहीत, तर नजीकच्या काळात उग्र आंदोलन उभारण्याचा निर्धार यावेळी जाहीर करण्यात आला. दुष्काळी परिस्थितीशी सतत संघर्ष करणा-या शेवगाव तालुक्यातील अनेक शेतक-यांनी गेल्या काही वर्षांपासून दूध उत्पादन व संकलनास प्राधान्य दिले आहे. शेती पूरक व्यवसाय म्हणून दूध उत्पादनात शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक केली आहे. अनेकांनी सहकारी, राष्ट्रीयीकृत बँकाकडून तसेच तालुका दूध संघाकडून व सहकारी संस्थेकडून दूध धंद्यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र दुधाचा सातत्याने कमी होणारा भाव, जनावरांचा चारा व पशुखाद्याचे वाढते दर, यामुळे दुग्ध व्यवसाय मोडकळीस आला आहे. दूध दराबाबत सरकारचे धरसोडीचे धोरण व दूध उद्योगाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे दूध उत्पादक शेतक-यांना हा उद्योग परवडेनासा झाला आहे. त्यामुळे दुधाला किमान प्रती लिटर ४० रूपये भाव मिळाला पाहिजे. शेतक-यांच्या पाठिंब्यावर केंद्र व राज्यात सत्तेवर आलेल्या शासनाने शेतक-यांची चालविलेली हेळसांड सहन करण्यापलिकडची असल्याने आता शेतक-यांना रस्त्यावर उतरण्याशिवाय तरूणोपाय नसल्याचा निर्धार पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले यांनी यावेळी व्यक्त केला.