देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठणच्या सरपंच जयश्री गुंजाळ, माजी उपसरपंच विश्वास गुंजाळ व मित्र मंडळाच्या वतीने कोरोना काळात सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळ्याचे आयोजन केले आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले असून अनेक लग्नायोग्य मुलामुलींचे कुटुंबीय कोरोनामुळे हिरावले गेले आहेत. काही कुटुंबीयांचा उपचारात पैसा खर्च झाला आहे. काही सामान्य व शेतकरी वर्गातील मातापिता पैशांअभावी मुलामुलींची लग्न करू शकत नाहीत, अशांसाठी विश्वासभाऊ गुंजाळ मित्रमंडळाने मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे आयोजन ढवळगाव येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात केले आहे.
एकाच दिवशी एक व जास्तीत जास्त दोन विवाह सोहळे सकाळी एक व संध्याकाळी एक आयोजित केला जाणार आहे. विवाह सोहळ्यास शासकीय नियमानुसार लोकांची उपस्थिती असेल तर वधूवरांचा वयाचा पुरावा दाखला सादर करावा लागणार आहे. ५० लोकांचे जेवण, ब्राम्हण, वाजंत्री, पाणी बाटल्या, अक्षदा, सॅनिटायझर, मंगल कार्यालय आणि इतर सुविधा आयोजकांतर्फे पुरविल्या जाणार आहेत.