संदीप घावटे
देवदैठण : दीड वर्षापासून कोरोना महामारी व वारंवार होणाऱ्या लॉकडाऊनमुळे ग्रामीण भागातील तरुण सैरभैर झाले आहेत. मात्र, वातावरण पूर्ववत झाल्यानंतर भरती सुरू होईल, या आशेतून तरुण तयारी करत आहेत. अशा परस्थितीत सध्या सुटीवर आलेले श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण येथील भारतीय सैन्यदलातील जवान अशोक वाघमारे हे सध्या देवदैठण करिअर अकॅडमीच्या माध्यमातून परिसरातील १०० तरुणांना दररोज मोफत भरतीपूर्व प्रशिक्षण देत आहेत.
जम्मू येथे कर्तव्यावर असलेले वाघमारे सध्या गावी सुटीवर आले आहेत. सैन्यदलातील आपल्या अनुभवाचा फायदा गावाकडील तरुणांना व्हावा, देशसेवा करण्यासाठी जवान तयार व्हावेत, यासाठी त्यांनी स्वतःच्या एक एकर शेतात मैदान तयार केले आहे. येथे ते तरुणांना गोळाफेक, लांब उडी, पुलअप्स, धावणे आदींबाबत प्रशिक्षण देत आहेत. या ठिकाणी देवदैठणसह राजापूर, माठ, मेंगलवाडी, बेलवंडी फाटा, ढवळगाव, हिंगणी येथील होतकरू तरुणांना या प्रशिक्षणाचा फायदा होत आहे. या अकॅडमीतील तरुणांसाठी सतीश वाघमारे यांनी १०० टी- शर्ट मोफत दिले आहेत.
------------------
या प्रशिक्षणामुळे भरतीची तयारी कशी करावी, हे समजले. गरीब परिस्थितीमुळे अकॅडमीला जाऊन इतर ठिकाणी प्रशिक्षण घेणे शक्य नाही. येथे मोफत प्रशिक्षण देताना वैयक्तिक लक्ष दिले जात आहे. भविष्यात याचा नक्कीच फायदा होईल.
-अक्षय शिंदे, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी
फोटो आहे