अहमदनगर : नवीन वाळू धोरणानुसार नागरिकांना ६०० रुपये ब्रास दराने वाळू विक्री सुरु झाली आहे. राज्यातील पहिले वाळू विक्री केंद्र श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे सुरु करण्यात आले असून, या केंद्राचा आढावा सोमवारी (दि.१५) महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी घेतला. यावेळी त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील मंजूर घरांना मोफत वाळू देणार असल्याची घोषणा केली. नायगाव डेपोतून आत्तापर्यंत २३७ ब्रास वाळू आवास योजनेतील घरांना मोफत दिल्याचेही ते म्हणाले.
विखे म्हणाले, राज्यातील बहुतेक जिल्ह्यात वाळू विक्री केंद्र कार्यान्वित करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. सामान्य नागरिकांना घरकुलासाठी वाळूची उपलब्धता होत आहे. सर्व अडचणी दूर झाल्याने काही दिवसात वाळू धोरणाची अंमलबजावणी जनतेच्या सहकार्याने यशस्वी होईल. असा विश्वास विखे यांनी यावेळी व्यक्त केला.
विखे म्हणाले, नायगाव वाळू केंद्रावर पंधरा हजार ब्रॉस वाळू उपलब्ध झाली असून आतापर्यत २३७ ब्रॉस वाळू घरकुलांना मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरूवातीला काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या अधिकारी कर्मचारी यांच्या दृष्टीने नवा विषय होता. परंतू आता सर्व अडथळे दूर झाले आहेत. नवीन ॲप आणि टोल फ्री क्रमांकही सुरू झाले असून, वाळू विक्रीच्या अंमलबजावणीत येत्या पंधरा दिवसात अधिक सुसूत्रता येईल, असे त्यांनी सांगितले.