अहमदनगर : दिवंगत माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी मुख्यमंत्री व माजी कृषिमंत्री शरदचंद्र पवार यांच्याशी अतिशय निकटचे संबंध असलेले काँग्रेसचे कार्यकर्ते, दिवंगत माजी स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समितीचे सदस्य सचिव बन्सीलाल कोठारी यांनी राजकारणासह सामाजिक क्षेत्रातही जामखेड तालुक्यात भरिव काम केले़ कोठारी यांचा जन्म ३१ जानेवारी १९२६ रोजी जामखेड तालुक्यातील जवळा येथे झाला. इयत्ता सावतीपर्यंतचे शालेय शिक्षण जामखेड येथे घेतले़ इंग्रजांचे आपल्या देशावर राज्य होते ही बाब त्यांना नेहमीच खटकत असे़ वयाच्या १६ व्या वर्षापासून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यासाठी स्वत:ला झोकून दिले होते. करारी पण तितकेच मनमिळावू स्वभावाचे व्यक्तिमत्त्व अशी त्यांची तालुक्यात ओळख होती़ वयाच्या १८ व्या वर्षी १९४६ साली त्यांनी जामखेड ग्रामपंचायतचे सरपंचपद भूषविले होते. याच काळात त्यांचा कडा येथील श्रीकंवरबाई यांच्याबरोबर विवाह झाला. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्या तीन मुलांवर त्याचा परिणाम होऊ न देता आपले शिक्षण जरी अर्धवट झाले तरी मुलांचे शिक्षण व्हावे यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. मोठा मुलगा अशोक कोठारी यांनी वकिलीचे शिक्षण घेऊन जिल्हा न्यायालयात वकिली व्यवसाय सुरू केला तर नगर अर्बन बँकेचे सलग दहा वर्षे ते अध्यक्ष होते़ त्यांचे दुसरे पुत्र रमेश कोठारी यांनी वैद्यकीय क्षेत्रातील एम़ डी पदवी घेतली़ तर तिसरा मुलगा सुमतीलाल कोठारी यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग करून स्वत:चा व्यवसाय करत आहेत़ सलग १६ वर्षे १९६२ पर्यंत सरपंचपदी कार्यरत राहिल्यानंतर बन्सीलाल कोठारी हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत साहेबराव पाटील यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय झाले़ जामखेड ग्रामपंचायत सरपंचपदी असताना व देश स्वातंत्र झाल्यावर त्यांनी १९५० रोजी हैदराबाद मुक्ती लढ्यात बॉर्डरवर तालुका कमांडर म्हणून रझाकारांशी दोन हात करत त्यांना पिटाळून लावले त्यांच्या या कामगिरीमुळे सरकारने त्यांना मानाची तलवार भेट दिली होती. त्यांचे हे कार्य राज्य व देश पातळीवर पोहचले़ जामखेड ग्रामपंचायत सरपंच असताना जामखेड व परिसरातील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी शाळेसाठी २९ शाळा खोल्या बांधल्या व शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली. १९६२ साली अस्तित्वात आलेल्या पहिल्या जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी काँग्रेस पक्षाकडून लढवून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले व १९६२ ते १९६७ पर्यंत जिल्हा परिषदेचे अर्थ व आरोग्य समितीचे सभापती म्हणून त्यांनी काम पाहिले़ १९६७ ते १९७२ पाच वर्षे जामखेड पंचायत समितीचे सभापती म्हणून काम पाहिले. याच कालावधीत गरिबांना आरोग्य सुविधा मिळावी यादृष्टीने जामखेड बाजारतळावर डॉ. रजनीकांत व डॉ. मेबल आरोळे हे नाममात्र दरात रूग्णांवर उपचार करीत असे. त्याकाळात अपुºया सोयीसुविधा व अज्ञानपणा, अंधश्रद्धा व वाढते साथीचे रोग यामुळे गरोदर माता, बालमृत्युचे प्रमाण अधिक होते. यासाठी पुढाकार घेऊन त्यांनी १९६९ ला डॉ. आरोळे दाम्पत्यास सात एकर जमीन जामखेड करमाळा रस्त्यावर बक्षीसपत्र देऊन त्यांना दवाखान्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. त्या ठिकाणी पत्र्याचे शेड टाकून डॉ. मेबल आरोळे यांनी दवाखाना टाकून गावोगाव जाऊन गावातील महिलांनाच आरोग्याबाबत ज्ञान देऊन आरोग्य सेविका केले. याच कामाच्या जोरावर डॉ. मेबल व डॉ. रजनीकांत आरोळे यांना आंतरराष्ट्रीय मॅगसेसे पुरस्कार मिळाला होता. शैक्षणिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करत असताना बन्सीलाल कोठारी यांची जामखेड येथील पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली़ त्यानंतर कोठारी यांनी संस्थेतंर्गत ल. ना. होशिंग विद्यालय, जामखेड महाविद्यालय व पॉलिटेक्निक कॉलेज साकत, हळगाव व राजुरी येथे विद्यालय सुरू करण्यात पुढाकार घेतला़ आज या संस्थेच्या शैक्षणिक प्रकल्पाचा वटवृक्ष झाला आहे. जामखेड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपलब्ध व्हावे या दृष्टीने भुतवडा तलाव बांधण्यात पुढाकार घेऊन तसेच जामखेड गाव चार जिल्ह्याच्या सीमेवर असल्याने वाहतुकीची वर्दळ पाहता बसस्थानक व आगार, औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणून आपला राजकीय ठसा दाखवून दिला. पीपल्स एज्युकेशन संस्थेचे ते निधनापर्यंत अध्यक्ष होते. सलग १८ वर्षे जिल्हा होमगार्ड कमांडंट म्हणून त्यांनी पदभार सांभाळला़ यासाठी त्यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. या कालावधीत त्यांनी अनेकांना होमगार्ड पदाबाबत माहिती देऊन त्यांना भरती करून शासनाची सेवा करण्याची संधी दिली. बॅरिस्टर अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांची केंद्र सरकारच्या आरोग्य समितीवर नियुक्ती केली होती. अनेक वर्षे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा सेक्रेटरी व जिल्हा उपाध्यक्ष व नंतर माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्रजी पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य म्हणून त्यांनी क ाम पाहिले. राज्यात आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्र शासनाने २००४ साली बन्सीलाल कोठारी यांची स्वातंत्र्य सैनिक उच्चाधिकार समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती केली. तसेच राज्य सरकारने दलित मित्र या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते़ कोठारी स्वत: स्वातंत्र्यसैनिक असल्यामुळे त्यांनी स्वातंत्र्यसैनिक असलेल्या सैनिकांची यादी तपासली़ त्यामध्ये अनेक बनावट नावे शोधून काढून त्यांचा लाभ बंद केला व शासनाचा तिजोरीवरील बोजा कमी केला़ हे प्रकरण राज्यात खूप गाजले होते. शासनाने त्यांच्या या कामाची दखल घेत त्यांना ९ आॅगस्ट २००५ रोजी क्रांतिदिनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. ए़पी़जे़ अब्दुल कलाम यांच्याहस्ते राष्ट्रपती भवनात सत्कार केला होता़ वार्धक्यामुळे राजकारणातून निवृत्त झाले तरी कोठारी समाजकारणात सक्रिय होते़ अशा या महान स्वातंत्र्यसैनिकाने ३ फेब्रुवारी २०१३ रोजी अखेरचा श्वास घेतला.
अशोक निमोणकर (लोकमत जामखेड तालुका प्रतिनिधी)