नेवासा : नेवासा बुद्रुक व परिसरातील गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी. नुकसान भरपाईपासून शेतकर्यांना वंचित ठेवणार्या ग्रामसेवक, तलाठी व कृषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, या मुख्य मागणीसाठी सोमवारी (दि.१९) नेवासा शेतकर्यांनी तहसील कार्यालयासमोर उपोषण केले. या उपोषणाचे नेतृत्त्व करणारे ९४ वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायंकाळी ६ च्या सुमारास प्रांताधिकारी, बीडीओ, तहसीलदार, कृषी अधिकारी यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने चर्चा निष्फळ ठरली. नेवासा बुद्रुक परिसरातील पंच्याहत्तर टक्के शेतकर्यांचे नुकसान होऊन ही संबंधीत अधिकार्यांनी पंचनामे न केल्याने शेतकरी वंचित राहिले. त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, संबंधीत अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी नेवासा बुद्रुकसह परिसरातील शेतकर्यांनी सोमवारी (दि.१९) रोजी सकाळी उपोषणास प्रारंभ केला. तहसीलदार हेमा बडे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन नागरिक व शेतकर्यांचे म्हणणे ऐकून घेतले. प्रांताधिकारी आल्याशिवाय आम्ही येथून हलणार नाही असा ठाम निर्धार केला. उपोषणस्थळी जि. प. सदस्य दिलीप वाकचौरे, भाजपाचे जिल्हा चिटणीस अनिल ताके, शेतकरी संघटनेचे त्रिंबकराव भदगले यांनी भेट देऊन उपोषणास पाठिंबा दिला. यामध्ये उपोषणाचे नेतृत्त्व करणारे ९४ वर्षीय ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक किसनराव जपे हे खुर्चीवरून खाली कोसळले. तेव्हा त्यांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. यावेळी एकच धावपळ उडाली. आता तरी उपोषणकर्ते उपोषण सोडतील अशी आशा असताना उपोषणकर्ते जागेवरून हालले देखील नाही. प्रांताधिकारी आल्याशिवाय व लेखी आश्वासनानंतरच आम्ही येथून उठू, असा निर्णय उपोषणकर्त्यांनी घेतला. (तालुका प्रतिनिधी) हे आहेत उपोषणार्थी शेतकरी या उपोषणामध्ये बाळासाहेब जायगुडे, प्रभाकर जायगुडे, बाळासाहेब कोकणे, अॅड.सादिक शिलेदार, ज्ञानेश्वर जायगुडे, संभाजी पवार, बाळासाहेब जाधव, संजय मारकरी, प्रवीण जपे, ह.भ.प. कोंडिराम महाराज पेचे, डॉ.महेश हापसे, अनिल बोरकर, सुरेश डौले, भानुदास रेडे, किशोर गायकवाड, कृष्णा ठाणगे, अर्जुन ठाणगे, डॉ.यादव, ह.भ.प. लक्ष्मण शिंदे, केशव महाराज डौले, कचरू महाराज बोरूडे, निवृत्ती डौले, दादासाहेब गंडाळ, नवनाथ मारकळी, अनिल हापसे यांच्यासह नेवासा बुद्रूक, साईनाथनगर, लेकुरवाळी आखाडा येथील शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. उपोषणार्थींशी चर्चा निष्फळ झाल्याने ते मंडपात बसून होते. सोमवारी सायंकाळी ६ च्या सुमारास प्रांतधकिारी राजेंद्र पाटील, तहसीलदार हेमा बडे, गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, कृषी अधिकारी सुधीर शिंदे यांनी उपोषणकर्ते अॅड.सादिक शिलेदार, बाळासाहेब जायगुडे, बाळासाहेब कोकणे, दादासाहेब गंडाळ, संभाजी पवार, डॉ. महेश हापसे यांच्याशी चर्चा केली. शेतकर्यांनी अधिकार्यांसमवेत गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांसंदर्भात चर्चा ही वस्तुस्थिती मांडून केली. मात्र याबाबत जिल्हाधिकार्यांना विचारून निर्णय घ्यावा लागेल, असे प्रांताधिकारी पाटील यांनी सांगितल्याने उपोषणकर्त्यांशी चर्चा निष्फळ ठरली. सर्व अधिकार्यांनी आम्ही जिल्हाधिकार्यांशी चर्चा करून सांगतो म्हणून ते तहसील कार्यालयात निघून गेले. यावेळी कॉ.बाबा आरगडे, जानकीराम डौले, दिलीपराव मोटे, दिलीप सरोदे, गफुरभाई बागवान, पी.आर. जाधव यांच्यासह अनेक राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते.
उपोषणार्थी स्वातंत्र्यसैनिक रुग्णालयात
By admin | Published: May 19, 2014 11:37 PM