श्रीगोंदा : रेल्वे स्टेशन साखर शेतीमाल इतर माल वाहतूक करण्यासाठी २५ वर्षांपूर्वी बंद पडलेला मालधक्का तीन महिन्यांपासून सुरू झाला. त्यामुळे परिसरातील ट्रक हमाल यांना हक्काचा रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या परिसरातील हाॅटेल, चहावाले, फळ विक्रेत्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत.
श्रीगोंदा साखर कारखान्याच्या साखरेची वाहतूक करण्यासाठी श्रीगोंदा रेल्वेस्थानकावर मालधक्का सुरू करण्यात आला. मात्र, १९९६ ला हा मालधक्का बंद झाला आणि परिसरातील व्यवसाय बंद पडले.
नगर येथील माल वाहतूकदार रमाकांत गाडे, नंदकुमार कोकाटे यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे रेल्वे प्रशासनाने मालधक्का सुरू केला आहे. या मालधक्क्यावरून नागवडे, घोडगंगा, अंबालिका, साजन शुगर, कुकडी साखर कारखान्याच्या साखरेची वाहतूक शेतीमाल करण्यासाठी फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाने मालधक्का सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचे माल वाहतूकदार बंडू तावरे, अस्लम शेख यांनी स्वागत केले.