घारगाव (जि अहमदनगर) : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावर संगमनेर तालुक्यातील खंदरमाळवाडी गावच्या हद्दीत रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास पुण्याकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अचानक आग लागली. सुदैवाने, यात कोणतीही जिवतहानी हानी झाली नाही. मात्र, ट्रक जळून खाक झाला. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही, चालक मात्र फरार झाला आहे.
प्रथमदर्शनी हा ट्रक अज्ञात वाहनाला पाठीमागुन धडकल्याने आग लागल्याची चर्चा आहे. दरम्यान, नाशिककडे जाणाऱ्या वाहनांचा रांगा लागल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याकडून नाशिकच्या दिशेने वाहनांचे साहित्य घेऊन ट्रक (क्रमांक - एम.पी.०९ ,एच.जी.०११२) नाशिकच्या दिशेने निघाला होता. ट्रक रविवारी पहाटे तीन वाजलेच्या सुमारास खंदरमाळवाडी गावच्या हद्दीत आला असता ट्रकने पेट घेतला. प्रथमदर्शनी ट्रक अज्ञात वाहनाला पाठीमागून धडकला असावा म्हणून ट्रकने पेट घेतला असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. यावेळी चालक फरार झाल्याने कारण अस्पष्ट आहे.
दरम्यान, ट्रकला आग लागल्याचे माहिती मिळताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील साळवे, मनेष शिंदे, उमेश गव्हाणे यांसह घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे,पोलीस कॉन्स्टेबल नामदेव बिरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नाशिकच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळ बंद करण्यात आली होती. संगमनेर महानगरपालिकेचे व साखर कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले होते. दोन्ही अग्निशामक बंबद्वारे ट्रक विझवण्यात आला. मात्र, सकाळी ट्रकच्या टायरची आग सुरूच होती. यात ट्रकचा फक्त सांगाडा शिल्लक राहीला आहे. अद्यापपर्यंत एकेरी वाहतूक सुरू आहे. मागील काही दिवसांपूर्वी याच महामार्गावर चंदनापुरी घाटात बारावीच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकला आग लागली होती.