लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर: भाजीवर तऱ्ही अन् तेला-तुपातील पोळी असेल, तर जेवणाची मजाच और असते. तेलामुळे जेवण स्वादिष्ट आणि रुचकर होत असले, तरी तेलाचा अतिवापर आरोग्यासाठी घातक ठरत आहे. हॉटेलमध्ये बहुतांशी वेळा तेलाचा वारंवार वापर करून पदार्थ तळले जातात. घरीही उरलेल्या तेलाचा फोडणी अथवा इतर पदार्थासाठी वापर केला जातो. तेलाचा असा वापर म्हणजे विविध आजारांना आमंत्रण असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.
तेलामध्ये एकदा कोणताही पदार्थ तळला आणि त्यानंतर त्याच उरलेल्या तेलात दुसरे पदार्थ बनविले गेले, तर अशा तेलात फ्री रेडिकल्स तयार होतात. हे रेडिकल्स मानवी शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम करतात. अनेकदा या रेडिकल्समुळे कॅन्सर होण्याची शक्यता वाढते, तसेच ॲसिडिटी, डायबेटिस, आतड्याचे आजार, पोटात गॅस होणे असे आजारही उद्भवण्याची शक्यता असते. स्नॅक्स सेंटर, तसेच रस्त्यांवरील छोट्या-मोठ्या हॉटेलमध्ये जिलेबी, वडापाव, भजी, चायनीज, पावभाजी, मिसळ आदी पदार्थ ग्राहक चवीने खातात. बहुतांशी हॉटेल चालक मात्र तेलाचा वारंवार वापरून करून पदार्थ तयार करतात. अशा हॉटेल चालकांवर अन्न, औषध प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
---------------
रस्त्यावरचे न खाल्लेलेच बरे
रस्त्यावरील स्टॉल, स्नॅक्स सेंटरवर खाद्यपदार्थ तयार करताना आवश्यक ती काळजी घेतली जात नाही. स्वच्छता ठेवली जात नाही. सध्या कोरोनासह साथीचे आजारही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे रस्त्यावरील पदार्थ न खाणेच चांगले आहे.
----------------------------
मोठ्या हॉटेलमध्ये तेलाचा वारंवार वापर होत नाही. मात्र, रस्त्यावरील छोटी हॉटेल्स, स्टॉल यावर असा प्रकार घडतो. अन्न, औषध प्रशासनाच्या वतीने तपासणी मोहीम सुरू आहे. कुठेही तेलाचा परत वापर केल्याचे आढळून आले, तर संबंधिताचा परवाना रद्द करणे, दंड अशा स्वरूपाची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे हॉटेल चालकांनी ग्राहकांना स्वच्छ व शुद्ध अन्नपदार्थ द्यावेत.
- एस.पी. शिंदे, सहायक आयुक्त अन्न, औषध प्रशासन
----------------------------
हॉटेलसह घरीही बहुतांशी वेळा विविध खाद्यपदार्थ तयार करताना एकदा वापरलेले तेल पुन्हा वापरले जाते. ही बाब आरोग्यासाठी घातक आहे. यामुळे ॲसिडिटी, हृदयासंबंधित आजार, अल्जायमर, पार्किंसन्सचे आजार, घशाची जळजळ, आतड्यांना सूज येणे, पोटात गॅस होणे, ब्रेस्ट कॅन्सर आदी आजार बळवण्याचा धोका असतो. तेलाचा पुन्हा वापर ही बचत नसून, आजारांना आमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे बाहेर खाताना आणि घरी पदार्थ तयार करताना प्रत्येकाने काळजी घ्यावी.
- डॉ.सतीश सोनवणे, कॅन्सर तज्ज्ञ
---------------------