बोधेगाव : कोरोनामुळे मागील हंगामात ऐन उन्हाळ्यात मातीचे माठ तयार करणारे उद्योग अडचणीत सापडले होते. मात्र सध्या आठवडे बाजारसह बाजारपेठ सुरळीत झाल्याने व्यावसायिकांना मालाची विक्री सहज करता येत आहे. यामुळे गरिबांचा फ्रिज यंदा ग्राहकांसोबतच माठ घडविणाऱ्या व्यावसायिकांच्या पोटाला थंडावा देत आहे.
उन्हाळ्यात मातीच्या माठातील थंड व चवदार पाणी पिण्याची अनेकांना आस असते. यासाठी शहरांसह ग्रामीण भागात बहुतांशी घरी दरवर्षी नवे माठ, रांजणी आदी खरेदी केले जातात. हे मातीचे माठ फ्रिजमधील थंडगार पाण्याप्रमाणे गरीब तसेच मध्यमवर्गीयांची तहान भागविण्याचे काम करतात. बोधेगाव (ता. शेवगाव) येथे रावसाहेब पलाटे, राम जाधव, किसन पलाटे आदी कुंभार व्यावसायिक आजही पारंपरिक पद्धतीने मातीपासून मोठ्या प्रमाणात माठ, रांजणी व इतर वस्तू बनवतात. काहीजण लाकडी चाकांऐवजी सध्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक कुंभारी चाकाचा वापर करून माठ उतरवीत आहेत. याद्वारे बनवलेला माल नगर, नेवासा, पैठण आदी तालुक्यात व्यापाऱ्यांना होलसेल तसेच परिसरातील बोधेगाव, शेवगाव, चापडगाव, मुंगी, पैठण, उमापूर, शिरूर, पाथर्डी आदी ठिकाणी भरणाऱ्या आठवडे बाजारात विक्रीसाठी पाठवतात.
बाजारात आकारानुसार १०० ते १५० रूपयांत माठ विकले जातात.
-------
असे घडवितात.. मातीचे माठ
प्रथम एका टाकीत सानवट किंवा चिकनमातीमध्ये राख, लीद, पाणी आदी टाकून मिश्रण कालवले जाते. तयार होणारा चिखल बाहेर काढून एक दिवस सेट होण्यासाठी तसाच ठेवला जातो.
त्यानंतर तो चिखल एकरूप होण्यासाठी पायाने तुडवण्यात येतो. मग फिरणाऱ्या चाकावर चिखल ठेऊन, त्यास हाताने आकार देत कच्चा माठ तयार केला जातो.
कच्च्या माठाला गोलाई येण्यासाठी कुदमे करणे, दुमारणे व संवाण करणे या तीन क्रियेतून एक पूर्ण कच्चा माठ घडविला जातो. तो माठ उलू नये, यासाठी ३ दिवस हवाबंद खोलीत ठेवला जातो.
त्यानंतर खोलीतून बाहेर काढून उन्हामध्ये पुन्हा ३ दिवस वाळविणे व लिपण्यासाठी ठेवला जातो. त्यानंतर दगड-विटांनी बांधलेल्या आव्यामध्ये (भट्टी) माठ रचून ठेवले जातात. एका आव्यात साधारणतः १०० माठ ठेवून त्यांवर राख, खापरे व बणग्या टाकून भट्टीला खालील बाजूने सरपण, टायर, रबर आदींच्या साहाय्याने पेटविले जाते.
साधारणपणे ५ ते ६ तासांनी कच्चा माठ तावून-सुलाखून पक्का होतो. रात्रभर तसेच ठेवून सकाळी तयार झालेले पक्के भाजलेले माठ विक्रीसाठी तयार होतात.
-----
माठांसाठी लागणारी गंगाकाठची माती, लीद, सरपण व इतर सर्व बाबी बाहेरून विकतच आणाव्या लागतात. यामुळे माठांच्या भावातही यंदा वाढ झाली आहे.
-रावसाहेब पलाटे,
कुंभार व्यावसायिक, बोधेगाव.
फोटो ओळी १५ बोधेगाव माठ
बोधेगाव येथील कुंभार व्यावसायिक रावसाहेब पलाटे इलेक्ट्रॉनिक चाकावर मातीचे माठ घडविताना.