श्रीगोंदा : सांगवी दुमाला येथील भीमा नदी पात्रातून वाळू तस्करी करताना बाळासाहेब पोपट घोगरे (रा. सांगवी) याचा ट्रक श्रीगोंदा तहसीलच्या महसूल पथकाने शनिवारी पकडला. ही कारवाई टाळण्यासाठी त्याने पथकाला धक्काबुक्की करीत स्वत:च्याच ट्रकवर डिझेल ओतून तो पेटविण्याचा प्रयत्न केला. तसेच विषारी औषध सेवन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. या गडबडीत त्याचा मुलगा अमोल हा ट्रक घेऊन फरार झाला. याप्रकरणी पिता-पुत्रासह अन्य एकाविरूद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.शनिवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास काष्टी मार्केटसमोर ही घटना घडली. काँग्रेसच्या पर्यावरण सेलचे जिल्हाध्यक्ष नाना नलगे यांच्या तक्रारीनुसार तहसीलदार महेंद्र महाजन यांच्या नेतृत्वाखाली पथक सांगवी येथे गेले होते. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तहसीलदार महेंद्र महाजन हे बेलवंडीचे मंडलाधिकारी परमेश्वर घोडके, अण्णा बनकर व हिंगणीचे तलाठी जयसिंग मापारी यांच्यासोबत सांगवी येथे गेले होते. याठिकाणी एक ट्रक (क्रमांक एम एच ४२,बी ७८६) बेकायदा उपसा केलेल्या वाळूची अवैधरित्या वाहतूक करताना आढळला. वाहनचालकाने ही ट्रक बाळासाहेब पोपट घोगरे (रा. सांगवी दुमाला) यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले. वाहन तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले. तेव्हा वाहन मालक घोगरे त्याठिकाणी आला त्याने महसूल पथकाला दमदाटी केली. तसेच त्याचा मुलगा अमोल यांनी ट्रकला मोटारसायकल आडवी लावून ट्रकवर डिझेल ओतून तो पेटवून देण्याचा प्रयत्न केला. तसेच महसूल पथकास शिवीगाळ व धक्काबुक्की केली.
महसूल पथकासमोरच वाळूतस्कराने घेतले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 3:51 PM