अहमदनगर : जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बिले थकविली असून, शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे बिले द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांची भेट घेऊन निवेदन दिले. शिष्टमंडळात माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, सतीश कानवडे, राजेंद्र बनसोडे, महेंद्र गंधे, सुवेंद्र गांधी, अमित गटणे, अंबादास ढाकणे, संदीप उगले, सुनील देवकर, जनार्दन रोहोम यांचा समावेश होता. या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची बिले थकविली आहेत. त्यामुळे कोरोनाच्या संकटकाळात ऊस उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. भार्गव कमिटीच्या शिफारशीनुसार उपपदार्थ निर्मितीतून मिळणारा नफा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्याची तरतूद आहे. परंतु, याकडे दुर्लक्ष होत आहे. कारखान्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असून, एफआरपीनुसार शेतकऱ्यांना बिले अदा करण्याबाबत कारखान्यांना आदेश द्यावेत. तसेच राज्य सरकार व दूध माफिया हातात हात घालून दूध उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत आहेत. दुधाला तीस रुपये भाव मिळावा, भेसळयुक्त दूध माफियांवर कारवाई करावी, यासह इतर मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.
...
सूचना: फोटो ०५ भाजप नावाने आहे.