अहमदनगर शहर सहकारी बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात शेळके याच्याविरोधात सप्टेंबर २०१८ मध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून शेळके फरार होता. दरम्यान, सुपारी देऊन जरे यांची हत्या घडवून आणणारा बोठे याचा गेल्या २३ दिवसांपासून पोलीस शोध घेत आहेत. बोठे हा पुणे येथे शेळके याच्याकडे लपल्याचा पोलिसांना संशय होता. याबाबत माहिती काढून पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांचे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पुणे येथे शुक्रवारी शोध घेतला तेव्हा शेळके सापडला. मात्र बोठे याने पुन्हा गुंगारा दिला. जरे हत्याकांड प्रकरणात शेळके यांची पोलीस चौकशी करणार आहेत. या चौकशीत काय समोर येते हे पाहून पोलीस त्याच्याविरोधात पुढील कायदेशीर कारवाई करणार आहेत. शेळके याला अपहाराच्या गुन्ह्यात आर्थिक गुन्हे शाखाही अटक करू शकते.
काय आहे शेळके याचे प्रकरण
नगर शहरात एम्स हॉस्पिटलची उभारणी करताना डॉ. निलेश शेळके याने अनेक डॉक्टरांचा विश्वास संपादन करून त्यांना हॉस्पिटलमध्ये भागीदार करून घेतले. त्यानंतर शहर सहकारी बँकेतील संचालक मंडळाला हाताशी धरून संबंधित डॉक्टरांच्या नावाने बोगस कर्ज प्रकरण करून घेत त्या रकमेचा अपहार केला, असा या प्रकरणातील फिर्यादींचा आरोप आहे. याप्रकरणी प्रत्येकी ५ कोटी ७५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची फिर्याद डॉ. रोहिणी सिनारे, उज्वला कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे यांनी दिलेली आहे.