जागतिक पर्यटन दिन विशेष/ सत्तार शेख/ हळगाव :पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी ३६ कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, सरकारने दिलेला साडेसहा कोटींचा निधी योग्य नियोजनाअभावी पडून आहे. चौंडी विकास प्रकल्पाला प्रस्तुत प्रतिनिधीने गुरूवारी भेट दिली असता अहिल्येश्वर मंदिराच्या मागील परिसरातील भाग कोसळण्याच्या मार्गावर असल्याचे दिसून आले. तसेच मंदिर परिसरात ठिकठिकाणी फरशी उखडलेली आढळून आली. गढी परिसरासह स्मृतीस्तंभाच्या भागातील भिंतींना चिरा पडल्या असल्याचे आढळून आले. दरम्यान काही स्थानिक नागरिक नक्षत्र गार्डनचा तसेच मंदिरांचा वापर झोपण्यासाठी करताना दिसले. चौंडी विकास प्रकल्पाची सध्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सामाजिक विकास प्रतिष्ठान या ट्रस्टच्या वतीने देखभाल केली जात आहे. ट्रस्टने अहिल्यादेवी स्मारक परिसराच्या देखरेखीसाठी दोन कर्मचाºयांची नेमणूक केलेली आहे. चौंडी प्रकल्प पर्यटकांना पाहण्यासाठी मोफत खुला आहे. शासनाने चौंडी विकास प्रकल्पाला भरिव निधी दिल्यास दुष्काळी जामखेड तालुक्यातील महत्वाचे पर्यटन केंद्र म्हणून चौंडी नावारूपास येऊ शकेल. त्यातून दुष्काळी जामखेड तालुका विकासाच्या नव्या उंचीवर येण्यास मदत होईल...ही कामे झालीस्मृतीस्तंभ, गढी परिसर विकास, शिल्पसृष्टी, मंदिरांचा जीर्णोद्धार, नक्षत्र गार्डन, प्राथमिक शाळा, पुर्नवसित घरकुले, चापडगाव येथे कमान, हेलिपॅड, सीना नदीवरील पूल, मानकोजी शिंदे सभागृह, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, विश्रामगृह, शिल्प सृष्टीचा परकोट, उद्यानाची संरक्षक भिंत...ही कामे बाकी सीना नदीवरील पुलाच्या पश्चिमेकडील बाजूस २०० मीटर लांबीचा नदीघाट व नौकायन, सीना नदीवरील बंधाºयाची उंची वाढवणे, सीना नदीवर पोटबंधारा बांधणे, सीना नदीवरील पूर्वेकडील बाजूस चौपाटी उभारणे, नक्षत्र उद्यानातील पुतळ्यांना संरक्षक छत्री, काचा बसवणे, गढी परिसरातील डागडुजी, तळघरांचा जीर्णोद्धार, संग्रहालय, अंतर्गत पक्के रस्ते, मीडिया सेंटर, लाईट शो, अहिलेश्वर मंदिर ते गढी संरक्षक भिंत बांधणे, भक्तनिवास बांधणे. प्रशासनाचे उदासीन धोरणपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थान असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडीचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यासाठी १९९५ पासून सरकारने चौंडी विकास प्रकल्प हाती घेतला खरा. परंतु प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे प्रकल्पासाठी सरकारने देऊ केलेला साडेसहा कोटींचा निधी धूळखात पडून राहिल्यामुळे प्रकल्पाचा विकास रखडला आहे, असे माजीमंत्री अण्णा डांगे यांनी सांगितले.
चौंडी विकास प्रकल्पाचा निधी पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 5:56 PM