कोपरगाव : आपणच अर्धवट निधी आणून घाईघाईने नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीला उद्घाटनाची कोनशिला लावली. आता त्याच इमारतीचे अर्धवट बांधकाम पूर्ण करण्यासाठी बंदिस्त नाट्यगृहाचा २ कोटींचा निधी वापरणार असल्याचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या टीकेला उत्तर देताना म्हटले आहे.
वहाडणे म्हणाले, कोपरगावात बंदिस्त नाट्यगृह व्हावे, यासाठी मी अनेक वेळा माजी मंत्री विनोद तावडे यांना भेटून निधीची मागणी केली. त्यावर वैशिष्ट्यपूर्ण निधी मंजूर झाला. नाट्यगृहासाठी पाटबंधारे विभागाची १ एकर जागा मिळावी, अशी मागणी केली. त्यावर त्यांच्याशी वारंवार पत्रव्यवहार केला. नाशिक पाटबंधारे विभागाने एक एकर जागेचा ३० वर्षांचे भाडे कराराने जागा हस्तांतरण व ५ वर्षांचा १ कोटी ५२ लाख ५४ हजार रुपयांचा आगाऊ भाडेपट्टा भरण्यासंदर्भात पत्र दिले. परंतु, २५ ते ३० लाखांचे वार्षिक भाडे देणे नगरपरिषदेला आर्थिकदृष्टीने परवडणारे नव्हते. त्यातच २०१७-१८ चा मंजूर निधी हा येत्या ३१ मार्च आधी खर्च न झाल्यास निधी परत जाण्याचा धोका होता म्हणून हा मंजूर निधी कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वळविण्यात यावा, यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार नाट्यगृहाचा २ कोटींचा निधी परत जाऊ न देता प्रशासकीय इमारत बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. याउलट, जाणीवपूर्वक वहाडणे यांना श्रेय मिळू नये, यासाठी तुम्ही सहकार्य केलेले नाही. बहुमताच्या जोरावर नुकतेच खुले नाट्यगृह नूतनीकरणाचे ९६ लाखांचे काम नामंजूर केलेले आहे. हे देखील लक्षात असू द्या, असेही वहाडणे यांनी म्हटले आहे.