अहमदनगर : कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून, मृत्यूंचे प्रमाणही वाढले आहे. नालेगाव अमरधाम स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी व्यवस्थेवर ताण येत आहे तसेच नातेवाईकांचीही गैरसोय होत असून, सावेडी कचरा डेपो येथे अंत्यविधी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.
जगताप म्हणाले, सावेडी स्मशानभूमी येथे कोरोना रूग्णांवर अंत्यविधीसाठीच्या जागेची पाहणी करून साफसफाई करण्यात आली आहे. याठिकाणी अंत्यविधी केले जाणार आहेत. त्यामुळे नातेवाईकांची होणारी गैरसोय टाळणे शक्य होणार आहे. विरोधी पक्षनेता संपत बारस्कर म्हणाले की, सावेडी कचरा डेपोमुळे या भागातील विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. कचरा डेपोच्या दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही मोठा परिणाम झाला होता. वारंवार कचरा डेपोला लागलेल्या आगीमुळे दुर्गंधी पसरत होती. या भागातील नागरिकांच्या विरोधामुळे डेपो व खत प्रकल्प बंद करण्यात आला आहे. त्यासाठी आरक्षणातील वापरायचे प्रयोजन बदलण्यासाठी शासनाची मंजुरी घेतली जाणार आहे. मात्र, आरक्षित जागेतील ४० टक्के जागेच्या वापराबाबत आयुक्तांच्या अधिकारात निर्णय घेतला असून, तातडीने या भागामध्ये कोरोना रूग्णांचे अंत्यविधी होणार आहेत. याच जागेवर आता कायमस्वरूपी स्मशानभूमी केली जाणार असल्याचे बारस्कर म्हणाले.
.....