अहमदनगर : येथील अमरधाम परिसरात होत असलेल्या दशक्रिया विधींनाही मोठी गर्दी होते. या गर्दीमुळेच दशक्रिया विधी करणारेच पुरोहित बाधित झाले आहेत. कोरोनाची ही बाधा टाळण्यासाठी पुढील पंधरा दिवस अमरधाममध्ये दशक्रिया विधीचे काम न करण्याचा निर्णय जिल्हा पुरोहित संघाने घेतला आहे.
जिल्हा पुरोहीत मंडळाचे अध्यक्ष किशोर जोशी यांनी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय जाहीर केला. त्यानंतर दिलेल्या पत्रकात जोशी यांनी म्हटले आहे की, नगर येथील अमरधाममध्ये होणारे दशक्रिया विधीचे काम ११ ते २९ सप्टेंबर याकाळात पुरोहितांकडून करण्यात येणार नाही. तसेच अमरधाममध्ये कोणत्याही प्रकारचे विधी केले जाणार नाहीत.
अंत्यविधी व दशक्रियाविधीसाठी होणाºया गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. अनेक जण आजारी आहेत. यात एक दोन पुरोहितांचा मृत्यूही झाला आहे. तर काही पुरोहितांच्या मुलांचा मृत्यू झाला आहे. नागरिक मृत झालेला व्यक्ती कोरोनाबाधित असल्याची माहिती पुरोहितांना देत नाहीत. तसेच त्यांचे नातेवाईक, मुले, विधी करणारे यजमान, कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती लपवत आहेत. काहीजण विधीला फक्त आमची घरचीच माणसे असल्याचे सांगतात. प्रत्यक्षात ५० ते ७० लोक हजर असतात. अनावश्यक गर्दी केली जाते. गर्दीतच विधी करण्याकरिता पुरोहितांवर दबाव आणला जातो.
सध्या कोरोनाचे जिल्हयात रोज ७५० ते ८०० रुग्ण आढळून येत आहेत. अंदाजे रोज १८ ते २० लोकांचा कोरोना आजाराने मृत्यू होत आहे. आदी बाबींचा विचार करून अहमदनगर जिल्हा पुरोहीत मंडळाने कोणतेही धार्मिक विधी अमरधाममध्ये न करण्याचा निर्णय सवार्नुमते घेतला आहे, असे जोशी यांनी म्हटले आहे.