जामखेड : तीन नव्या कृषी कायद्यांचा निषेध नोंदविण्यासाठी युवक काँग्रेसने जामखेड शहरात सोमवारी सकाळी अकरा वाजता कृषी कायद्याच्या प्रतींची अंत्ययात्रा काढली. यावेळी केंद्र शासनाचा निषेध नोंदविला. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
खर्डा चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहाजी राजेभोसले, युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राहुल उगले, जिल्हा सचिव सुनील शिंदे, शहराध्यक्ष जमीर सय्यद, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष फिरोज पठाण, कुंडल राळेभात, युवकचे तालुकाध्यक्ष शिवराजे घुमरे, शहराध्यक्ष विक्रांत अब्दुले, बळीराम पवार, अनिकेत जाधव, अमोल सदाफुले, अंकुश मुसळे, रोहित खरात, चेतन फुंदे, सूरज वाघमारे, श्रीकृष्ण वाघ, उमेश उगले, प्रीतम ढगे, हर्षल पवार आदी उपस्थित होते.
राहुल उगले म्हणाले, केंद्र सरकारने कोणतीही चर्चा न करता घाईघाईत कृषीबाबतची तीनही विधेयके लोकसभा व राज्यसभेमध्ये मंजूर करून घेतली. त्यामुळे पंजाब व हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दहा दिवसांपासून दिल्ली शहराला वेढा घातला आहे. शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन सरकारने शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत, असे आवाहन त्यांनी केले.
( फोटो ०६ जामखेड काँग्रेस)
जामखेड येथे नवीन कृषी कायद्यांच्या प्रतींची अंत्ययात्रा काढण्यात आली.