कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या महामारीमुळे अनेक ठिकाणी भटक्या-विमुक्त समाजातील कुटुंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. नगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारात असेच डवरी गोसावी समाजाचे ५० कुटुंब गेल्या वर्षभरापासून वास्तव्यास आहेत. या समाजाचा गावोगावी, दारोदारी जाऊन बहुरूपी कला सादर करत उदरनिर्वाह सुरू होता. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लोकमतने वृत्त प्रकाशित करून समाजाने, शासनाने त्यांना मदत करण्याबाबत आवाहन केले होते. त्यानंतर समाजातील विविध स्तरातून त्यांच्याकडे मदतीचा ओघ सुरू झाला.
बुधवारी (दि. २६) तहसीलदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, सामाजिक कार्यकर्ते युवराज गुंड यांच्या माध्यमातून पद्मशाली सोशल फाउंडेशन आणि लयक्षेट्टी परिवाराच्या वतीने येथील ५० कुटुंबांना धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नगर तालुका पंचायत समितीच्या सभापती सुरेखा गुंड यांचे पती संदीप गुंड, काँग्रेस तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, पत्रकार अन्सार शेख, मैत्री प्रतिष्ठानचे श्याम कांबळे, जिवा लगड, पद्मशाली सोशल फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश लयक्षेट्टी, शिवानीताई लयक्षेट्टी, अध्यक्ष रोहित गुंडू, अजय लयक्षेट्टी, श्रीनिवास बुरगुल, शुभम सुंकी, प्रकाश कोटा, आकाश अरकल, वरद लयक्षेट्टी, वैभव अरकल, राहुल पासकंटी, श्रावणी लयक्षेट्टी आदी उपस्थित होते. या उपक्रमासाठी उद्योजक दीपक लांडगे यांचेही सहकार्य लाभले.
-----------
फोटो - २६टाकळी मदत
टाकळी काझी येथील डवरी गोसावी समाजाला पद्मशाली सोशल फाउंडेशन आणि लयक्षेट्टी परिवाराच्या वतीने धान्य व किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.