अहमदनगर : कर्जमाफीच्या रकमा, बोंडअळीची नुकसान भरपाई देण्याचे सौजन्य सरकारने दाखवले नव्हते. राष्ट्रवादीने सुरु केलेल्या आंदोलनानंतर कर्जमाफीचे पैसे जमा करण्याचा केविलवाना प्रयत्न सरकारने केला. आता फसव्या सरकारच्या विरोधातील रोष संघटित होत आहे, असे राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी सांगितले.हल्लाबोल यात्रेला नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून आज, बुधवारी प्रारंभ झाला. त्यानंतर नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत तटकरे बोलत होते. तटकरे म्हणाले, सरकारचे अजूनही डोळे उघडत नाहीत. कापसाच्या नुकसानीचे पैसे सरकारकडून अद्याप मिळालेले नाहीत. सरकार शेतक-यांसाठी काहीही करीत नाही. सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलनाचा हा तिसरा टप्पा आहे.रोजगार न मिळाल्यामुळे सरकारकडून तरुणांची फसवणूक होत आहे, अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. दीडपट हमीभाव, दोन कोटी रोजगार ही सर्व फसवी आश्वासने आहेत. सरकारच्या या नाकर्तेपणाविरोधात जनमानस एकवटत आहे. आता आम्ही विभागीय आयुक्तालयावर हल्लाबोल करणार आहोत, असे तटकरे यांनी सांगितले. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसेपाटील, आमदार संग्राम जगताप आदी उपस्थित होते.
पाथर्डीमध्ये पीआयनेच कट रचला. त्यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नाही. राज्याला मागे नेणारे भाजप सरकारचे काम करीत आहे. सध्या आठ लाख कोटी कर्ज राज्यावर झाले आहे. उत्पन्न घटले आहे, अशा शब्दात अजित पवार यांनी सरकारवर टीका केली.पवार म्हणाले, जे जे पक्ष येतील, त्यांना मान दिला जाईल. भाजप - सेना हाच प्रमुख विरोधक आहे. जिल्हा विभाजन सोपे नाही़ त्यासाठी आर्थिक भार सोसण्याची ताकद सरकारची असावी लागते़ जिल्हा विभाजन हा चुनावी जुमला आहे. लोकांचे लक्ष विचलित करण्याचा सरकारचा डाव आहे. चार वर्षात सरकारने काय दिवे लावले ते सांगा, कोणते आश्वासन पाळले, ते सांगा़ फक्त आपल्या देशात पेट्रोल महाग आहे. या सरकारवरचा सगळ्यांचा विश्वास उडाला आहे.