दहिगाव : शेवगाव तालुक्यात ग्रामपंचायतीचा निवडणूक प्रचार निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला आहे. शुक्रवारी (दि.१५) मतदान होणार असून २ हजार ४७४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जगदंबा माता ग्रामविकास मंडळ आणि रेणुकामाता ग्रामविकास परिवर्तन मंडळ यांच्या प्रत्येकी ११ उमेदवारांसह पाच अपक्ष असे एकूण २७ उमेदवार ११ जागांसाठी निवडणूक लढवत आहेत.
सध्या मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरू असून जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर उभे आहे. अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. गुप्त बैठकांना वेग आला आहे. प्रचारात जगदंबा माता ग्रामविकास मंडळ त्यांनी केलेला विकास आणि पारदर्शी कारभार या मुद्यावर भर देताना दिसत आहे. रेणुकामाता ग्रामविकास परिवर्तन मंडळ सत्ता एकाच ठिकाणी केंद्रित न होता सत्तेचे विकेंद्रीकरण व्हावे या परिवर्तनवादी मुद्यावर जोर देताना पाहायला मिळत आहे.
अपक्षांच्या रूपाने युवा चेहरे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीत अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. काय होणार याचा अंदाज युवा वर्गापासून राजकारणातील जाणकार मंडळी घेत आहेत. चौकाचौकांतील चर्चेतही आता निवडणुकीचाच विषय रंगत आहे. आम्ही राजकारणासाठी नाही तर गाव विकासासाठी ही निवडणूक लढवत असल्याचे मतदारांना सांगितले जात आहे.